अरे बापरे : मागासवर्गीय शालेय विद्यार्थिनींच्या सायकलींची परस्पर विल्हेवाट


नगर पंचायत समितीतील प्रकार; आ.निलेश लंकेच्या जनता दरबारात तक्रार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शालेय विद्यार्थिनींना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मंजूर झालेल्या लेडीज सायकली नगर तालुका पंचायत समितीच्या कार्यालयातून एका व्यक्तीने बोगस सह्या करून त्या खर्‍या लाभार्थ्यांना न देता परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हिंगणगाव येथील सात मागासवर्गीय शालेय मुली या सायकली पासून वंचित राहिल्या आहेत.

शालेय मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यालयात जाण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत सायकल देण्याची तरतूद केली आहे. हिंगणगाव (ता. नगर) येथील विद्यार्थ्यांनी 2016-17 या साली सायकलीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. या विद्यार्थिनींच्या सायकलही मंजूर करण्यात आल्या. मात्र या सायकली पंचायत समिती कार्यालयातून परस्पर लाभार्थ्यांच्या सह्या न घेता बनावट सह्या करून त्या लाभार्थ्यांच्या नावाने सायकली पंचायत समिती मधून नेण्यात आल्या. सायकली देणार्‍या अधिकार्‍यांनी कुठलीही चौकशी न करता संबंधित व्यक्तिला सायकल दिल्या. त्यांनी लाभार्थ्यांना सायकल न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगणगाव मधील स्नेहा कांबळे, नम्रता कांबळे, प्रियंका पाडळे, निकिता पाडळे, उत्कर्षा पाडळे, अनिता माळी, राणी वैराळ या सात मुलींना सायकली मिळाल्या नाहीत.




हा प्रकार गंभीर असून याचा तात्काळ तपास करावा या मागणीचे निवेदन हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे जनता दरबारात दिले. तसेच या लाभार्थ्यांना सायकली मिळाव्यात अशी मागणी सरपंच सोनवणे यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली आहे. लंके यांनी तात्काळ कारवाई करून करण्यात यावी असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. ज्या अधिकार्‍यांनी या सायकली दिल्यात त्या अधिकार्‍याची चौकशी करण्यात यावी. ज्या व्यक्तीने या खोट्या सह्या करून सायकली घेऊन परस्पर दिल्यात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल असे सोनवणे यांना आ.लंके यांनी सांगितले.




निंबळक गटातील हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे निंबळक गटात अजून किती लाभार्थी आहेत हे उघड होणार आहे. 2012 ते 2017 या कालावधीमध्ये गटात समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणारा सायकली, पत्रे, कडबाकुट्टी, शिलाई मशीन याचा मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन निंबळक ग्रामपंचायत सदस्य राजू कोतकर व गोवर्धन कोतकर यांनी गटविकास अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे दिले होते. या निवेदनाची दखल घेतल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post