अहमदनगरमध्ये कट्टयाचा धाक दाखवून युवकास लुटले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- प्रवासी म्हणून कारमधील तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करीत मोबाईल विविध बँकचे एटीएम कार्ड व 5 हजार रुपये हिसकावून घेऊन कोयत्याचा व गावठी कट्याचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना स्वस्तिक चौक ते रांजणगाव दरम्यान रविवारी (दि. 16) रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडली.

याबाबतची माहिती अशी की, महेश दिलीप मारेकर (वय 32, रा. ठाकूर निमगाव, ता. शेवगाव) हा रांजणगाव येथील फ्लेक्स कंपनीत कामाला आहे. सोमवारी सकाळी ड्युटीवर जाण्याकरीता मारेकर हा रविवारी सायंकाळी शेवगावहून नगर येथील पुणे बसस्थानक येथे आला. रांजणगाव येथील रुमवर लवकर जाण्याकरीता खासगी वाहनाने जाण्यासाठी तो स्वस्तिक चौकातील अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर थांबला. त्याचवेळेस राखाडी कलरची एक कार त्याच्या जवळ आली. कारमध्ये तिघेजण बसलेले होते. त्यांनी कोठे जायचे असे विचारले व मारेकर याला गाडीत बसण्यास सांगितले. गाडीत बसताच तिघांनी त्याला दमदाटी करुन त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला व गाडी पुणे दिशेने नेऊन त्याच्याकडील तीन एटीएम कार्ड व 5 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. पुणे बायपास जवळील मंदिरापासून कार मागे वळून केडगाव बायपासला आणली. त्यावेळी त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून मारहाण केली. एकाने त्याच्या गळ्याल कोयता लावला तर दुसर्‍याने गावठी पिस्तुल दाखवून आता तुला मारायचे आहे असे म्हणून आम्ही दोन पोलिसांना मारुन त्यांना अॅडमिट केले. आम्हाला ओळखले का असे म्हणून त्याला केडगाव बायपास जवळ सोडून दिले.

तिघांच्या हातून सुटताच मारेकर याने जवळच्या हॉटेलमध्ये जावून फोन करुन नातेवाईकांना माहिती दिली. व कोतवाली पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. दुपारी उशिरापर्यंत कोतवाली पोलिस घटनेबाबत कसून माहिती घेते होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post