वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा मध्ये काँग्रेसच्यावतीने 'संविधान बचाओ' महारॅली काढण्यात आली. या महारॅलीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले. या मार्चनंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मोदी यांच्यावर शरसंधान साधले. नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधारा आहे. यात फारसे अंतर नाही. परंतु, मी गोडसे यांचा भक्त आहे, असे बोलण्याची नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी या रॅलीत म्हणाले की, मी भारतीय आहे, यासाठी कोणीही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आहे. कोण भारतीय आहे. व कोण भारतीय नाही, हे सांगण्यापर्यंत नरेंद्र मोदी कोण आहेत. ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि नोकऱ्यांविषयी विचारले तर ते लोकांचे लक्ष हटवण्यासाठी दुसरा मुद्दा बोलतात, असे राहुल गांधी म्हणाले. काश्मीरमधील उद्धभलेली परिस्थिती आणि आसाममध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.