शिवभोजन योजनेत अहमदनगरमध्ये पाच केंद्रांना मंजुरी


: २६ जानेवारीस पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरजवंतांना सवलतीच्या दरात शिवभोजन योजनेची घोषणा केलीे. यासंदर्भातील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय एक जानेवारी रोजी जारी करण्यात आला. दरम्यान नगर शहरात पाच ठिकाणी शिवभोजन केंद्रांना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंजुरी दिली आहे. शिवभोजन योजनेत जिल्हा प्रशासनाने राज्यात पथदर्शी आघाडी घेतली असून येत्या २६ जानेवारी रोजी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजन केंद्रांचे विधिवत उद्घाटन होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या रणधुमाळीतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाममात्र दरामध्ये राज्यातील गरजू व्यक्तींना भोजन उपलब्ध करून देण्याची ग्वाही जाहीरपणे दिली होती. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात दिलेल्या ग्वाहीनुसार शिवभोजन योजनेची घोषणा केली. या योजनेसंदर्भात नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी अर्थात एक जानेवारी रोजी राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिव भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहून या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. शिवभोजनासाठी लाभार्थी व्यक्तीकडून दहा रुपये नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात संबंधित चालकांना दिली जाणार आहे. यासाठीचा निधी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत संबंधित शिवभोजन योजनेच्या चालकांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे.यासाठी गठीत असलेल्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. तर सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत.

आज चालकांचा प्रशिक्षण वर्ग
शिवभोजन योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी होण्याच्या हेतूने शिवभोजन केंद्र चालकांचा प्रशिक्षण वर्ग आज मंगळवार दि.१४ संपन्न होणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी , जिल्हा आरोग्य अधिकारी, मनपा अधिकारी , अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त , सहायक कामगार आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशासनाचा पाठपुरावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाकांक्षी स्वरूपात शिवभोजन योजना कार्यान्वित केली आहे. योजनेची जिल्ह्यात पथदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्या निर्देशात पुरवठा विभागाने पावले उचलली. शहरातील अनेक ठिकाणी पुरवठा विभागाच्या पथकाने मागील दोन आठवड्यात प्रत्यक्ष भेटी देत माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशात जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनील सौंदाणे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, पुरवठा निरीक्षक विजय ऊमाप , अव्वल कारकून महेश म्हस्के या टीमने गतिमानता दाखवल्याने राज्यात नगरमध्ये पहिले शिवभोजन केंद्र मंजूर झाले आहे.

पाच शिवभोजन केंद्र
१ ) हमाल पंचायत कष्टाची भाकर केंद्र ( माळीवाडा बसस्थानक )
२ ) हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र ( तारकपूर बसस्थानका समोर )
३ ) दत्त हॉटेल ( रेल्वे स्टेशन समोर )
४ ) कृष्णा भोजनालय ( जिल्हा रुग्णालया जवळ , तारकपूर रोड
५ ) हॉटेल आवळा पेलेस ( मार्केट यार्ड प्रवेशद्वार )  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post