शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिवजयंती दिनीच करावे – किरण काळे


यावर्षीच्या भव्यदिव्य आयोजनासाठी यजमान पद नगर जिल्ह्याला देण्याची मागणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शासनाने शिवजयंती दिनीच (१९ फेब्रुवारी) करावे, अशी मागणी निवेदना द्वारे क्रीडा मंत्री ना. सुनील केदार आणि राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांच्याकडे नगर विकास मंचाचे निमंत्रक किरण काळे यांनी काल मुंबईत केली आहे.

याबबत बोलताना काळे म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम शिव प्रेमींच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी नितांत आदर आणि श्रद्धा आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा शिवजयंतीच्याच (१९फेब्रुवारी) दिवशी दिला जावा अशी शिवप्रेमींची इच्छा आहे.

पूर्वी तत्कालीन आमदार आणि जेष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांनी याबाबत तत्कालीन क्रीडा मंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत शिवजयंती दिनी आयोजन देखील केले होते. मात्र ही परंपरा पुन्हा विखंडीत झाली. ती यावर्षी पासून पुन्हा सुरु करण्यात यावी. यासाठी या खात्याचे मंत्री म्हणून दोन्ही मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

काळे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या वर्षीच्या शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यासाठीचे यजमान पद अहमदनगर जिल्ह्याकडे देण्यात यावे. आम्ही शिवप्रेमी अहमदनगर येथे या सोहळ्याचे भव्य-दिव्य आणि दिमाखदार आयोजन करू.

यासाठी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या विकृत मनोवृत्तीचा तीव्र निषेध
भाजप कडून देशात छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा किळसवाना प्रकार सुरु आहे. महाराष्ट्रात आणि सबंध जगात महाराजांसारखा योद्धा आजवर झाला नाही आणि होणारही नाही. भाजपच्या या विकृत मनोवृत्तीचा निषेध किरण काळे यांनी आपल्या पत्रकात केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post