कर्जमाफीच्या आधार जोडणीत अहमदनगर जिल्हा बॅंकेची आघाडी!


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकराने गोष्ट केलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आधार क्रमांकाशी निगडित आहे. निश्चित करण्यात आलेल्या निकषानुसार एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये, हा यामागे सरकारचा दृष्टिकोन आहे.यासाठी शेतकऱयांच्या आधार माहितीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या आधार जोडणी मोहिमेत जिल्हा सहकारी बॅंकेने जवळपास १०० टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बॅंकांकडील शेतकऱयांच्या आधार जोडणीचे कामकाज रेंगाळले असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.

नागपूर येथे संपन्न झालेल्या विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीतील मुद्दल, व्याजासहित थकीत असलेली व परतफेड न झालेल्या दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱयांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषित केली आहे.

कर्जमाफीसाठी दोन लाखांपर्यंतच्या थकीत कर्जाचे कर्जदार शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक याची माहिती घेण्याचे काम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर संचालनात सहकार विभागातर्फे युध्दपातळीवर सुरू आहे.शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, आधार क्रमांकाची माहिती संबंधित संस्थेकडे जमा करावी,असे आवाहन देखील शेतकऱयांना करण्यात आले आहे. ७० लेखापरीक्षकांच्या मार्फत पात्र लाभार्थ्यांची माहिती तपासण्याचे काम होणार आहे.शेतकऱ्यांनी याबाबत माहितीची शहानिशा करावी, काही अडचण वाटल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधवा. जिल्हा बॅंकेतील कर्जदारांची संख्या दोन लाख ५८ हजार ७५५ आहे. त्यांची थकीत रक्कम एक हजार ५४३ कोटी ५२ लाख इतकीआहे. एक फेब्रुवारीपासून माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.१५ मेपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आधार माहितीच्या मोहिमेत जिल्हा बॅंकेची आघाडी राहिली आहे.या योजनेसाठी जिल्हा बॅंकेकडे पात्र लाभार्थी शेतकऱयांची संख्या २ लाख ५८ हजार ७५५ इतकी आहे. यापैकी अवघे ९०० शेतकऱ्यांची आधार संबंधी माहिती घेण्याचे काम बाकी आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रीयकृत बॅंकांचे केवळ ४१ हजार २१७ लाभार्थी खातेदार असताना त्यापैकी तब्बल ७ हजार ३५० खातेदारांची आधार विषयक माहिती येणे बाकी आहे.

सोसायटीत आधारची माहिती द्या
याबाबत प्रतिनिधीने संवाद साधला असता सहायक निंबधक हरिश्‍चंद्र कांबळे म्हणाले, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आधार क्रमांकाशी निगडित आहे.योजनेसाठी कुठलाही अर्ज करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही.मात्र, ज्या शेतकऱ्यांचे आधार, मोबाईल क्रमांक बॅंका, सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये अपडेट नाहीत, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बॅंका, सोसायट्यांमध्ये जाऊन आधार विषयक माहिती त्वरित द्यावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post