सरकारी धोरणाविरोधात कामगारांचा 8 जानेवारीला देशव्यापी संप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – देशातील 11 कामगार संघटनांनी सरकारच्या कामगार, शेतकरी व सर्वसामान्य माणुसविरोधी धोरणाचा निषेध आणि मुख्य मागण्यांसाठी 8 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

विद्यमान सरकारने आपली सर्व धोरणे हि मूठभर भांडवलदार हिताची केलेली असून, सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत. कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस नोटबंदी, जिएसटीची चुकीची अंमलबजावणी आणि इतर चुकीच्या धोरणांमुळे प्रचंड त्रासलेला आहे. देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असून, मंदीचा तडाखा बाजाराला बसत आहे. देशहिताच्या आपल्या मागण्यांकडे सरकार ठरवून दुर्लक्ष करत आहे, अशी भावना या सर्व घटकाची झालेली आहे.

आपल्या मागण्यासाठी अहमदनगरमधील सर्व कामगार संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला असून, देशातील शेतकरी संघटनासुध्दा या संपात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

त्याच्याच नियोजनाची बैठक आज दिल्लीगेट येथील एमएसएमआरए कार्यालय, सुपेकर मेडिकल शेजारी येथे झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान अॅड. कॉ.सुभाष लांडे यांनी भुषविले तर बैठक संचलन प्रा.डॉ. कॉ.महेबुब सय्यद यांनी केले.

या बैठकीमधे राज्यकर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे यांनी राज्य कर्मचारी संघटनेची भूमिका आणि नियोजन सांगितले तर एमएसएमआरएचे कॉ.सिध्देश्वर कांबळे, कॉ.सुभाष कांबळे, कॉ.सतीश भुस, कॉ.संदीप निंबाळकर यांनी औषध विक्री व वैद्यकिय प्रतिनिधींचे प्रश्न समजावून सांगून संपात मोठा सहभाग होणार असल्याचे कळविले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकाळी 10 वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांचा मोर्चा नेण्यात येणार असल्याचे ठरले असुन अहमदनगरमधील सर्व कष्टकरी, कामगार, शेतकरी, सर्वसामान्य जनता, व्यापारी बांधव यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरूध्द संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सदर नियोजन बैठकीस कॉ.शंकरराव न्यालपेल्ली, कॉ.महादेव पालवे, कॉ.मिलिंदराव जपे, कॉ.दिपकराव शिरसाठ, कॉ.तुषार सोनवणे, यशवंत तोडमल, भाऊसाहेब डमाळे, भैरवनाथ वाकळे, कॉ.विकास गेरंगे आदी उपस्थित होते.

या संप आणि मोर्चामधे राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सिटू, आयटक, लाल बावटा विडी कामगार संघटना, इंटक विडी कामगार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, अहमदनगर वर्कर्स युनियन (टीयुसीसी), महाराष्ट्र इंजीनिअरिंग उद्योग संघटना, महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकिय प्रतिनिधी संघटना, महानगरपालिका कामगार संघटना, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय किसान सभा, क्रांतिसिंह कामगार संघटना आदी सहभागी होणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post