शहरासोबतच ग्रामीण भागात दुपारपर्यंत पेटल्या शेकोट्या
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – राज्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. परिणामी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे नगरसह विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी (दि.4) पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळाली. या दाट धुक्यामुळे आणि बोचर्या थंडीने नगरकर चांगलेच गारठले होते. त्यामुळे ठिकठिकाणी दुपारपर्यंत शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले. नगर शहर परिसरात थेट सकाळी 11 नंतर सूर्यदर्शन झाले.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुके पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत असताना आता धुके पडण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी अधिकच दाट धुके पडले होते. पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत धुके होते. ढगाळ हवामानामुळे सूर्यदर्शनही उशिरा झाले. तोपर्यंत चांगलाच गारठा जाणवत होता. धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. अनेक वर्षांनतर असे धुके शहरात पहावयास मिळाल्याचे जेष्ठ नागरिकांना सांगितले. काही अंतरावरील रस्ता दिसत नसल्याने वाहने लाइट सुरू करून आणि मंदगतीने जात होते. हाय-वे आणि अंतर्गत रस्त्यांवरही अशीच अवस्था होती. उपनगरातून शहराकडे पाहिले असता काहीच दिसत नव्हते. दुपारी उशिरापर्यंत हवेत झोंबणारा गारठा जाणवत होता.
दाट धुक्यासोबत थंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना पहायला मिळत होते. तर बहुतांश नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडताना पाहायला मिळत होते.
संपूर्ण शहर जणू धूक्यात हरवल होत. सकाळी शाळेत गेलेल्या मुलांना मात्र ढगातील शाळा पहायला मिळाली. आज शनिवारी सकाळची शाळा असल्याने विविध शाळांमध्ये मुलांनी धुक्यात केलेल्या कवायतीचा आनंद लुटला. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पहाटेच या धुक्याच दर्शन झाले. रस्त्यावरुन चालतांना त्यांना मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडाचा आधार घ्यावा लागला. अनेकांनी या धुक्यात मोबाईलवर सेल्फी फोटो काढून आनंद लुटला. सायकलवरून शाळेत जाणार्या मुलांनी धुक्याचा आनंद लुटला.
पारा घसरून थंडीच्या लाटेची शक्यता
उत्तरेमध्ये खाली घसरलेल्या पार्याचा गेल्या चार दिवसांपासून हळुहळू राज्यातील तापमानावर परिणाम दिसून येत आहे. मुंबईसहित कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली. विदर्भात तीन दिवस थंडीची लाट आली होती. अनेक ठिकाणी किमान तापमान 6 ते 8 अंशांपर्यंत खाली आले होते. विदर्भात नेहमी उत्तरेकडून येणारे थंड वारे यंदा दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व या दिशेनेसुद्धा येत आहेत. यामुळे विदर्भात आर्द्रता वाढून पावसाळी वातावरण तयार झाले आणि विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इथे वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. मात्र, हवेत गारवा असल्याने ही थंडी बोचरी ठरते आहे. शनिवारपासून ही परिस्थिती बदणार असून आकाश मोकळे होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे पारा घसरेल. 6 जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असून पारा 9 अंशांपर्यंत घसरू शकतो. परंतु 7 जानेवारी रोजी परत एकदा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Post a Comment