माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह सचिन कोतकरला जामीन मंजूर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप आणि सचिन भानुदास कोतकर या बंधुंना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांनी आज( दि .13) जामीन मंजूर केला आहे.


शेवगाव येथील रहिवाशी असलेला लॉटरी विक्रेता अशोक भीमराज लांडे यांची दि.19 मे 2008 रोजी केडगावमध्ये अमानूष मारहाण करून खून करण्यात आला. कोतवाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकरराव राऊत यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात सप्टेंबर 2013 मध्ये आरोपी भानुदास कोतकर, त्याचे मुले संदीप, सचिन आणि अमोल इतर साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला.

नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल या चौघांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती.

आरोपी भानुदास कोतकर यांना उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. त्यापाठोपाठ अमोल कोतकर यांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी महापौर संदीप आणि सचिन यांनी ही अ‍ॅड. अभय ओस्तवाल (औरंगाबाद) यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अ‍ॅड. ओस्तवाल यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. जामीन कालावधीत जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post