गांजा प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी जिल्हा रुग्णालयातून फरार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – विना परवाना गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलीसांनी पकडलेल्या आरोपीने आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलीसाच्या हातावर तुरी देत पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड, सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. या प्रकरणामुळे 'कोतवाली' पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कोतवाली पोलीसांनी तीन दिवसापूर्वी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला होता. यातील सागर धनापुरे हा एक आरोपी होता.

दोन दिवसापासून सागरच्या पोटाचा त्रास होत असल्याने रविवारी रात्री कोतवाली पोलीसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी एक पोलीस कर्मचारी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रांत:विधिसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धूम ठोकली.

कर्मचाऱ्यांने त्याचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पसार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post