'त्यांचे' आम्ही पुरावे दिले आहे - कर्डीले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमचा पराभवाचा वस्तुस्थिती अहवाल मांडला आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवबद्दल पुरावे द्या आणि उदाहरण, आम्ही त्याच वेळेला अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

मात्र, चौकशी पूर्ण होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या कर्डिले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

कर्डिले म्हणाले, "आमचा पराभवानंतर आम्ही मुंबईमध्ये लेखी पत्र दिले आहे. त्यावर सर्व आजी माजी आमदारांच्या सह्या आहेत. बबनराव पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह मोनिका राजळे, राम शिंदे, स्नेहलता कोल्हे व माझीही सही आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात दिले आहे. त्यामुळे आमच्या भूमिकेत बदल केलेला नाही". त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. त्या वेळी झालेल्या चर्चेमध्ये पराभवाची चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार विजय पुराणिक तसेच भाजपाचे निरीक्षक काळकर यांची चौकशीसाठी नियुक्ती झाली असून चार दिवसांपूर्वी माझ्या घरी राम शिंदे, मोनिका राजळे व माझी चौकशी करण्यात आली आहे. आम्ही सर्व पुरावे तसेच आमच्या म्हणणे आम्ही त्या समितीसमोर सादर केले आहेत. लवकरात लवकर समिती या प्रकरणाची चौकशी करेल, असे आम्हाला आशा आहे. मात्र, चौकशी पूर्ण होऊन, निर्णय होत नाही, तोपर्यंत आमची नाराजीही कायमच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post