शिक्षिकेची 21 लाखांची फसवणूक



माय अहमदनगर वेब टीम
अहमददनगर - नायजेरियन गुन्हेगारांनी जामखेड येथील एका शिक्षिकेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिला तब्बल २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. शिक्षिकेने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. मार्क हॅरिल्युके याच्यासह एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. मार्क हॅरिल्युके असे नाव धारण केलेल्या व्यक्तीने ११ जानेवारी रोजी सदर शिक्षिकेस फेसबुकवरून फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. शिक्षिकेचा विश्वास संपादन करून तिचा व्हॉटस्अ‍ॅप नंबर घेतला. यानंतर डॉ. मार्क याने तुमच्या मुलासाठी मी यूके येथून लॅपटॉप आणि मोबाईलचे गिफ्ट पाठवित असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी सदर शिक्षिकेस दिल्ली येथून एका महिलेने फोन केला. तिने दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगितले.
'तुमच्या नावे यूके येथून एक गिफ्ट आले असून तपासणीदरम्यान त्यात ५० हजार पाउंड स्कॅन झाले आहेत. आपण परदेशातून भारतात काळा पैसा मागितला आहे. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी धमकी दिली.
गुन्हा दाखल होण्याच्या धमकीने घाबरून गेलेली शिक्षिका पैसे भरण्यास तयार झाली. त्यानंतर त्या दिल्लीच्या महिलेने दिलेल्या विविध बँक खात्यावर या शिक्षिकेने २१ लाख ४१ हजार रुपये भरले. पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post