माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील विविध गंभीर आणि संवेदनशील प्रश्न केंद्र सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था, प्रलंबित गुन्हे, सामाजिक न्याय तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.खासदार नीलेश लंके यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी शिष्टमंडळातील खासदारांनी यावेळी केली. या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
बीड जिल्ह्यातील स्व. महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणात तपासात होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
फलटण येथे घडलेल्या स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी खासदार लंके यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदतीचा आग्रह
महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची विदारक परिस्थिती मांडून, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्याला भरीव मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेती, घरे आणि उपजीविकेचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
निवडणूक हिंसाचार व रोख रक्कम
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान झालेला हिंसाचार तसेच मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या रोख रकमा लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे नमूद करत, याबाबत कठोर आणि निर्णायक कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.

Post a Comment