माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविताना प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर क** कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यांनी दिलेल्या निर्देशानुसार पतंगासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरा संदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिका घनकचरा विभागामार्फत आयोजित मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांच्या बैठकीमध्ये आयुक्त डांगे यांनी या सूचना दिल्या.
प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो. शरीरास गंभीर दुखापती होतात. तर अनेकदा मृत्यू देखील होतात. त्यामुळे अशा प्रकारचा प्रतिबंधित नायलॉन मांजा पतंगासाठी वापरू नये असे आवाहन आयुक्त डांगे यांनी यावेळी केले. याचबरोबर सामाजिक भान राखून नागरिकांनी देखील स्वयंप्रेरणेने अशा प्रकारच्या मांजाचा वापर टाळावा, प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेले पतंग वापरू नयेत. असे आवाहन यावेळी आयुक्त डांगे यांनी केले.
प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती १) शहर सावेडी - ८९९९८६६ ३०९ २) झेंडीगेट मुकुंद नगर - ८३७९९०४६६७ ३) बुरुडगाव - ९४२२७२७४६५
४) केडगाव - ९०११०५२७५५ या चार मोबाईल दूरध्वनी क्रमांकावर द्यावी. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधित मांजा विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन आयुक्त तथा प्रशासकी यशवंत डांगे यांनी केले आहे.
या बैठकीस घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, हरिभूमी प्रतिष्ठानचे अभय ललवाणी, मुख्य स्वच्छता निरीक्षक परिक्षीत बिडकर, प्रशांत रामदिन, तुकाराम भांगरे तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

Post a Comment