चोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगरमधील आडत व्यापारी अभिजित विजय बोरुडे यांचा चोरीला गेलेला 13 लाख 6 हजार 500 रुपये किंमतीच्या 23 टन 240 किलो कांद्यापैकी 12 लाख रुपये किंमतीचा 22 टन कांदा कर्नाटक राज्यातील म्हैसुर येथून जप्त करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. कांदा चोरणारे आरोपी मात्र पसार झाले असून त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगरमधील आडत व्यापारी अभिजित विजय बोरुडे यांचा कांदा राजेंद्र चंद्रभान आवारे यांच्या सहयोग ट्रान्सपोर्टमार्फत चालक रविंद्र बद्रिनाथ म्हस्के याने ट्रकमध्ये भरुन भुवनेश्‍वर कांदा मार्केट (ओरिसा) येथे घेऊन गेला होता. 1 जानेवारी रोजी कांद्याचा ट्रक तेथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, 3 जानेवारीपर्यंत तो ट्रक तेथे पोहोचला नाही. चालक म्हस्के याने एजंट मुन्नाभाई, निजाम शेख यांच्या साथीने या कांद्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय आल्याने राजेंद्र आवारे यांनी ट्रक व कांद्याच्या अपहाराबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पो.नि.दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली समांतर तपास केला असता चालक रविंद्र म्हस्के तसेच बापूसाहेब भाऊसाहेब नवले (रा.नेवासा फाटा) यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने सदरचा कांदा कर्नाटकातील म्हैसुर येथील बंडीपाल्या कांदा मार्केट येथील दुकानात विकला असल्याचे समजले.

त्यानुसार पोलीस पथकाने म्हैसुर येथे जावून दुकान मालक फैयाज अहमद अब्दुल रशिद याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी म्हस्के व नवले यांनी हा कांदा आपणास विकला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील 12 लाख रुपये किंमतीचा 22 टन कांदा जप्त करुन नगरला आणला आहे. दरम्यान, आरोपी पसार झालेले असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post