जेऊर परिसरातील विद्यार्थिनींना मिळाला पोलिसांकडून 'दिलासा'


विद्यार्थिनींनी निर्भीडपणे वाईट प्रवृत्तींचा प्रतिकार करावा- पोलीस उपनिरीक्षक काळे

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जेऊर नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमियोंचा वाढलेल्या उपद्रवाबद्दल प्रसिद्धीमाध्यमांनी वाचा फोडल्यानंतर अहमदनगर येथील दिलाचा सेलच्या पथकाने जेऊर परिसरात गस्त घालून रोड रोमिओंवर चांगलीच दहशत बसवली आहे.

त्याच अनुषंगाने श्री संतुकनाथ इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी दिलासा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक जयश्री काळे व त्यांच्या पथकाने मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पो.उपनिरीक्षक जयश्री काळे यांनी विद्यार्थिनींनी मनात भीती न बाळगता कुठलाही अनुचित प्रकार घडत असेल तर पालक, शिक्षक अथवा पोलिसांशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनींनी वाईट प्रवृत्तीचा प्रतिकार करण्यास शिकणे गरजेचे आहे. जेऊर परिसरातील रोड रोमियोंचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आश्वासन काळे यांनी दिले.

रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याबाबत जेऊर ग्रामस्थांच्या वतीने एम.आय.डि.सी. पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते. परिसरात रोडरोमियोंनी उच्छाद मांडला असुन त्यांचे आपसातील वाद नित्याचेच बनले होते. मुलींना कट मारणे, धुमस्टाईल दुचाकी चालवणे, टोळक्याने उभे राहुन दहशत पसरवणे तसेच मुलींना अपशब्द वापरणे हे प्रकार सर्रास घडत होते. विद्यालय परिसर तसेच बसस्थानक परिसरात घोंगावणारे रोडरोमियो दोन दिवसांपासुन दिलासा पथकाच्या धास्तीने गायब झाले आहेत.

जेऊर परिसरातील विद्यार्थिनींना 'दिलासा' पोलीस पथकाकडुन दिलासा मिळाला आहे. संतुकनाथ विद्यालयात झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात दिलासा पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक जयश्री काळे, पो.ना.कुचे मॅडम, पो. ना.औटी मॅडम, पो.हे.कॉ. वाघ, पो. कॉ. कसाब, पो.कॉ. फरताडे यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच गणेश पवार, सचिन म्हस्के, रविराज तोडमल,प्रशांत सोनवणे उपस्थित होते. प्राचार्य बापुसाहेब गायकवाड व उपमुख्याध्यापिका ऊषा पारधे यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post