महापालिका प्रशासनाला अजून किती बळी हवेत? ; मनपाचा निषेध करत माजी नगरसेवकाने स्वखर्चाने बुजविले खड्डे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात दररोज होत असतानाही महापालिका प्रशासन सुस्त आहे.याचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने मुरुमाच्या गाड्या आणून दिल्ली गेट परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले आहेत.
शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतूकीला मोठी अडचण होत आहे. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नालेगाव गोगादेव मंदिरासमोरील रस्त्यावरील खड्डयामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महापालिकेने खड्डे बुजविणारी कोणतेही उपाय योजना आतापर्यंत केलेली नाही. वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही सुस्त प्रशासनाला कोणताही फरक पडलेला नाही. त्यांना अजुन किती बळी हवे आहेत, असा सवाल माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी व्यक्त केली. सोमवारी (दि.२७) रात्री महापालिकेचा निषेध करत म्हणुन स्वत: खर्चाने मुरूमाच्या गाड्या आणुन दिल्ली गेट परिसरातील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविला.नगरकरांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहोत, हे दाखवितांनाच त्यांनी मनपाच्या गलथान कारभारावर खरमरीत टिका केली.
एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक संपूर्ण कुटुंब त्यामुळे उध्वस्त झाले तरीही नालायक प्रशासनाला जाग येत नाही. एक दिवस उलटुनही मनपाचा एकही अधिकार्याने संबंधित कुटुंबाला सांत्वना तर दिली नाहीच मात्र खड्डे बुजविणे हा आपले नैतिक कर्तव्य आहे, याची जाण देखील त्यांना राहिलेली नाही. फक्त बिले काढणे व न केलेली कामे दाखविणे एवढ्यातच प्रशासन सज्ज आहे, त्यांचा मी निषेध करतो, असे सांगत त्यांनी स्वत: घमेले व फावडे घेऊन परिसरातील खड्डे बुजविले.
यावेळी महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी आपली जबाबदारी न झटकता माणुसकीच्या भावनेतुन आपले नैतिक कर्तव्य समजुन निदान काहीच नाही तर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मल्लय्या सब्बन, किसन गाजिंगे, पुरूषोत्तम सब्बन, राहुल मुथ्था, महेश महाधर, सोनु बोरूडे, अशोक ताडला, मोहसीन शेख, उत्तम मिसाळ, निलेश उदगीर आदी कार्यकर्त्यांनी स्वत: खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत भाग घेतला.
Post a Comment