निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीची तारीख ठरली ; 'या' दिवशी होणार फाशी


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी चारही आरोपींचा डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने मंगळवारी हा महत्वाचा निकाल जारी केला.न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार, 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता या दोषींना फासावर लटकवले जाणार आहे. दोषी अक्षय, पवन, मुकेश आणि विनय यांच्याकडे डेथ वॉरंटविरुद्ध अपील करण्यासाठी 14 दिवसांची मुदत आहे. त्यांनी अपील केले नाही तर त्यांना ठरलेल्या वेळेच्या आत फाशी दिली जाईल.

दोषी अक्षयने न्यायाधीशांकडे बोलण्याची परवानगी मागितली आणि मीडिया बातम्या लीक करत असल्याचे आरोप केले. यानंतर मीडियाला कोर्टरुममधून बाहेर जाण्यास सांगितले. अक्षयने सांगितले, की ते सगळेच आरोपी क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करणार आहेत. दोषींच्या वकिलांनी सुद्धा न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. परंतु, क्युरेटिव्ह पेटिशनच्या नावे वेळ वाया घातला जात असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी मांडला. त्यांची याचिका 2018 पासून प्रलंबित होती अशात बचाव पक्ष असे म्हणू शकत नाही की त्यांना संधी मिळाली नाही असेही सरकारी वकिलांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post