नगर पंचायत समितीवर चौथ्यांदा भगवा ; सभापती कोकाटे तर भापकर उपसभापती


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -नगर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी कांताबाई कोकाटे तर उपसभापतीपदी रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे सभापती पदाचे उमेदवार स्वातीताई कार्ले व उपसभापती पदाचे उमेदवार बेबीताई पानसरे यांनी संख्याबळ कमी असल्याने माघार घेतली. कोकाटेताई युवानेते प्रविण कोकाटे यांच्या मातोश्री आहेत. सभापती -उपसभापती या निवडी एक वर्षासाठी असून त्यानंतर सुरेखा गुंड व डॉ दिलीप पवार यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया तीन वाजता प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. छाननी मध्ये चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. महाआघाडीकडून सेनेच्या उमेदवार कांताबाई कोकाटे यांच्यासमोर भाजपाच्या स्वातीताई कार्ले यांचा अर्ज होता तर महाआघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भापकर यांच्यासमोर भाजपाच्या

बेबीताई पानसरे यांचा अर्ज होता. अर्ज वैध ठरल्यानंतर माघारी साठी १० मिनिटांचा वेळ देण्यात आला. या मध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड प्रांत अधिकारी यांनी घोषित केली.







महाआघाडीकडे बारा पैकी आठ पंचायत समिती सदस्य होते त्यामुळे त्यांचे संख्याबळ बहुमतात होते, भाजपाकडे एकूण ४ सदस्य होते. त्यांना बहुमतासाठी आणखीन तीन सदस्यांची आवश्यकता होती, त्यांनी ३ सदस्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणुकीचे सर्व काम पाहिले असून त्यांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक पार पडली. दोन्ही विजयी उमेदवारांचा प्रांताधिकाऱ्यांनी सत्कार केला. गेली अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली सेनेचे पंचायत समिती वर एकहाती वर्चस्व आहे. या निवडणुकीत जि प चे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ झोडगे, बांधकाम चे माजी सभापती बाळासाहेब हराळ, काँग्रेस तालुका अध्यक्ष संपत भाऊ म्हस्के, शिवसेना तालुका अध्यक्ष राजू भगत, प्रकाश कुलट यांनी महत्वाची भूमिका बजावली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post