शहरात चायना मांजा विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या चायना मांजाचा सर्रासपणे वापर होत असून या मांजाच्या विक्रेत्यांना ना कायद्याचा धाक ना महापालिकेचा, ना पोलिसांची भिती राहिलेली आहे. याला प्रशासनाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. असा आरोप करीत जर चायना मांजा विक्री विरोधात कारवाईची मोहीम तातडीने सुरु करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली महेश शेळके, सुदर्शन वाळूंज, अनिकेत शियाळ,निखील बुरा, निखील देशपांडे, प्रकाश गायकवाड, अमोल बोरुडे यांच्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त प्रदीप पठारे यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की, चायना मांजाच्या सर्रासपणे विक्रीला प्रशासनाचा नाकर्तेपणा जबाबदार असून चिरीमिरीचा महत्वाचा भाग या निमित्ताने मिळत असल्याने प्रशासन ढिम्म झालेले आहे. त्या चायना मांजा विक्रेत्यांकडून चिल्लर जमा करणे जर सोडले तर माणसांचा जीव तरी वाचेल ही भावना जनमानसात प्रशासनाबद्दल झालेली आहे. दर वेळी या बद्दल निवेदन देऊन सुध्दा काहीच फरक पडत नाही. बंदी असलेली वस्तू सर्रासपणे विकली जाते, याबद्दल प्रशासनाला काहीच कसे वाटत नाही. या जीवघेण्या मांजामुळे पशु पक्ष्यांचे जीवन धोक्यात आहेच पण रस्त्याने चालणाऱ्या माणसांच्या जीवाचं काय ? परवा एक युवती इंपिरीअल चौकातून बुरूडगांव रोड कडे दुचाकी वरून जात असतांना पतंगचा मांजा गळ्यात अडकला पण तोंडाला स्कार्प बांधला होता म्हणून तीचा जीव वाचला. तरी या मांजामधून वाचण्याच्या नादात तीचा अपघात होता होता राहिला, या घटनेला कोणाला जबाबदार धरायचे ? या प्रकारच्या घटना दररोज घडत आहेत. आता कोणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ? याचे उत्तर द्यावे. अधिकारी वर्ग ए.सी.गाडीतून फिरत असाल पण पायी चालणाऱ्यांने, दुचाकीवरून जाणाऱ्याने आता वरती पाहून चालायचे कि पुढे पाहुन ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या विषयावर गांभिर्याने कारवाई करा आणि ही कारवाई दोन चार दिवसांची नको तर या मध्ये सातत्य ठेवा. जर तीन दिवसाच्या आत या चायना मांजा विरोधात मोहिम सुरू झाली नाही तर याचा निषेध म्हणून आम्ही आपल्या तोंडाला काळं फासण्यात येईल. कारण जनतेचा भावनांचा उद्रेक होत असेल तर याला प्रशासनच जबाबदार राहील. या कारवाई मध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत करा अन्यता आम्ही आमच्या पध्दतीने आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
Post a Comment