कलाकाराने खाल्ले सव्वा लाख डॉलरचे केळे!


माय अहमदनगर वेब टीम
मियामी -  एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या कलाकृतीत मांडलेले केळे खाल्ल्याची घटना येथील समुद्र किनाऱ्यावर झालेल्या आर्ट बेझल शोमध्ये घडली आणि एकच खळबळ उडाली. ही कलाकृती एका फ्रेन्च कलारसिकाने १,२०,००० डॉलर मोजून खरेदी केली होती. मात्र हा सगळाच प्रकार आयोजकांनी खेळकरपणे घेतला आणि त्या 'खादाड' कलाकाराला हा शो सोडून जाण्यास सांगण्यात आले.
इटालियन कलाकार मौरिझिओ कॅटेलन यांनी आर्ट बेझल शोमध्ये कॉमेडियन नावाची कलाकृती मांडली होती. त्यामध्ये कलाकृतीच्या मधोमध भिंतीवर चक्क एक खरे केळे पाइप जोडण्याच्या टेपने चिकटवण्यात आले होते. विविध कलाकृती पाहण्यासाठी कलारसिकांनी या प्रदर्शनात एकच गर्दी केली होती. त्यातच डेव्हिड डेट्युना हा कलाकारही होता. त्याने कॉमेडियन कलाकृतीकडे येत, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ते केळे भिंतीवरून काढले आणि सर्वांसमोर खाण्यास सुरुवात केली! क्षणभर आयोजकांना काय होते आहे तेच कळेना.
डेव्हिडला याबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'कलाकाराची कलाकृती आणि एक भुकेलेला कलावंत. केळे चवदार आहे, ते तिथे लावणाऱ्या कलाकाराला धन्यवाद!' डेव्हिडचे कलाप्रेम सर्वांनाच माहीत असल्याने आयोजकांनी कोणताही वाद न घालता त्यांना तेथून जाण्यास सांगितले. प्रदर्शनाचे संचालक ल्युसिन टेरास यांनी सांगितले की, डेव्हिडने कोणतेही नुकसान केले नाही. केळे ही त्या कॉमेडिन कलाकृतीतील एक विनोदी कल्पना होती.
डेव्हिडच्या या कृतीनंतर या कॉमेडियन कलाकृतीत नवीन केळे त्याच पाइप जोडणाऱ्या टेपने चिकटवलेही गेले!

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post