... अन गाळेधारकांच्या काळजाचा ठोका चुकला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - वाडिया पार्क क्रीडा संकुलातील 'बी' बिल्डींगची पाडापाडी सुरू झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील गाळेधारक तेथे जमा झाले. या बिल्डींगचे पाडकाम झाल्यावर मनपाचा मोर्चा 'ए' बिल्डींगकडे वळणार तर नाही ना, या विचाराने गाळेधारकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण 'बी' बिल्डींगची पाडापाडी तीन-साडेतीन तासात थांबली व मनपाचे पथक माघारी फिरल्याने गाळेधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, दिवसभर त्यांच्यात या पाडापाडीचीच चर्चा होती. या प्रकरणी न्यायालयात काम पाहणाऱ्या वकिलांनाही त्याची माहिती देण्यात आली. येत्या मंगळवारी (१० डिसेंबर) खंड़पीठात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी काय भूमिका घ्यायची, यावरही चर्चा सुरू होती.
वाडिया पार्क क्रीडा संकुल झाल्यावर त्याच्या पार्किंगसाठी बाहेर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या डाव्या व उजव्या बाजूला मोकळी जागा सोडण्यात आली होती. वाडिया पार्क क्रीडा संकुल डिझाइनमध्ये या जागांवर कारंजे व बगीचा प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते तर येथे पार्किंग जागा असल्याचे मनपाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर या जागी दोन इमारती उभ्या आहेत. या पैकी 'ए' बिल्डिंगमध्ये ७९ गाळे व 'बी' बिल्डिंगमध्ये मॉल सदृश १००च्या वर गाळे आहेत, यापैकी 'ए' बिल्डिंगमधील गाळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना देण्यात आले आहेत. या दोन्ही इमारतींना महापालिकेने आक्षेप घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, २०१२-१३मध्ये दोन्ही इमारती पाडण्याच्या आदेश झाले होते, पण गाळेधारकांनी खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर दोन्ही इमारती सील केल्या. आजतागायत त्या सीलबंद आहेत. तेथील व्यावसायिकांना बिल्डर एम. आर. ट्रेड सेंटरचे जवाहर मुथा यांनी वाडियापार्क संकुलाच्या स्टेडियमलगत असलेल्या अन्य व्यावसायिक गाळ्यांमध्ये पर्यायी जागा दिली आहे. तेथे एकेका गाळ्यात दोन व्यावसायिक कामे चालतात. यादरम्यान वाडिया पार्क इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर त्यावेळच्या २०१३ मधील आघाडी सरकारने वाडिया पार्क क्रीडा संकुलाचा उद्देश बदलला. 'वाडिया पार्क क्रीडा संकुल व व्यावसायिक दुकाने' असा उद्देश केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी खंडपीठाने गाळे पाडण्यास स्थगिती दिली हाती व २०१४ मध्ये दिलेली ही स्थगिती आजतागायत कायम असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 'बी' इमारत पाडण्याचे काम सुरू झाल्यावर 'ए' इमारतीमधील गाळेधारक अस्वस्थ झाले. ती इमारत पाडल्यावर आपलीही इमारती पाडली जाईल काय, अशी भीतीही त्यांच्या मनात दाटून आली होती. पण मनपाचे पथक माघारी फिरले व गाळेधारकांच्या जीवात जीव आला.
Post a Comment