' त्या ' गुन्हेगारांना दया याचिका करण्याचा अधिकारच नको
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पोक्सो अर्थात लहान मुलांच्या लैंगिक शोषणातील गुन्हेगारांना दया याचिका करण्याचा अधिकार नको असे विधान राष्ट्रपतींनी केले आहे. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. संसदेने दया याचनांवर फेरविचार करायला हवा असा सल्ला देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजस्थान येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजस्थानच्या सिरोही येथील एका कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली. यामध्ये बोलताना राष्ट्रपती म्हणाले, 'महिलांचे संरक्षण हा गंभीर मुद्दा आहे. पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार प्रकरणी दोषी सापडलेल्यांना दया याचना करण्याचा अधिकारच नको. संसदेला दया याचिकांवर समीक्षण करायला हवे.' देशात सध्या बलात्काराची प्रकरणे चर्चेत आहेत. त्यामध्ये 16 डिसेंबर 2012 च्या निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींपैकी एक विनय शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचना केली आहे. तर हैदराबादेत महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे शुक्रवारी भल्या पहाटे एन्काउंटर करण्यात आले. त्यातच उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात जामीनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला कोर्टात जात असताना जिवंत पेटवले. या तिन्ही घटनांवरून देशभर संताप व्यक्त केला जात असताना राष्ट्रपतींचे विधान अतिशय महत्वाचे मानले जात आहे.
Post a Comment