वाडिया पार्क असुविधांबाबत आमदारांकडून जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांची कानउघाडणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगरची महिला खेळाडू महाराष्ट्राचे नेतृत्व करते ही शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. शहरातून अनेक चांगले खेळाडू घडत असून, क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. क्रीडा शिक्षक पैश्यासाठी नव्हे तर खेळ टिकविण्यासाठी व चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी तळमळीने कार्य करीत असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
ट्रॅक रेसर्स स्पोटर्स फाऊंडेशनची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे हिने सुगुर (पंजाब) मध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत एक रौप्य व दोन कास्य पदक पटकाविल्याबद्दल तिचा जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना व ट्रॅक रेसर्स स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी देखील हजेरी लावल्याने आमदार जगताप यांनी आपल्या भाषणात जिल्हा क्रीडा संकुलबाबत असलेल्या असुविधा व कारभाराबाबत त्यांची कानउघाडणी केली. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेत प्रा.सुनिल जाधव, रंगनाथ डागवाले, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, शितोळे सर, विजयसिंह मिस्कीन, प्रशिक्षक दिनेश भालेराव, ऐश्‍वर्या कल्याणकर, सुधाकर सुबे, प्रताब बांडे, भरत बिडवे, सागर भिगारदिवे, राजेंद्र निंबाळकर, तन्वीर सर, सचिन काळे, गुलजार शेख, अमित चव्हाण आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, खेळाडू घडविण्यात क्रीडा शिक्षक व पालकांचा मोलाचा वाटा आहे. क्रीडा शिक्षक खेळाडू व क्रीडा प्रेमींमुळे जिल्हा क्रीडा संकुल उभा राहिला आहे. मात्र हा संकुल वेगळ्या विषयांनीच चर्चेचा विषय बनला आहे. सुविधा नसल्याने एपीएल सारखी फ्लड लाईट क्रिकेट टुर्नामेंट इतर दुसर्‍या ठिकाणी घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. तर सावेडी येथील जाँगिग ट्रॅकवर देखील बास्केटबॉलचे मैदान तयार करण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिव्यांगी लांडे हिने शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत एक रौप्य व दोन कास्य पदक पटाकावून राष्ट्रीय स्पर्धेत तीन पदक मिळवणारी जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. दिव्यांगी ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनची खेळाडू असून, ती वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये दिनेश भालेराव व ऐश्‍वर्या कल्याणकर याच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या अगोदर दिव्यांगीने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत व तिच्या नावावर राज्य विक्रम सुद्धा आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post