“आ.रोहित पवार यांना नामदार करा “




माय अहमदनगर वेब टीम
कर्जत - “पवार साहेब, आ. रोहित पवार यांना नामदार करा” अशा आशयाचे फलक सध्या कर्जत शहरात आणि सोशल मिडियावर झळकले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कर्जत जामखेडला पुन्हा संधी मिळती काय ? याविषयी चर्चा जोर धरू लागली आहे.

गुरुवारी संध्याकाळी राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. देशात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात तिन्ही प्रमुख पक्षाचे आमदार यांना मंत्री होण्याचे भाग्य मिळणार आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपाचे मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभेत श्रीगणेशा केला. त्यामुळे युवा नेतृत्व म्हणून सबंध नगर जिल्हा आणि कर्जत जामखेडचे महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्याकडे नामदार म्हणून पाहत आहे. याच धर्तीवर कर्जत शहरातील सदगुरु ग्रुपच्या वतीने कर्जत बसस्थानक परिसरात कर्जत जामखेड तालुक्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सामान्य जनतेच्यावतीने शरद पवार साहेब यांना विनंती आहे की, आ. रोहित पवार यांना नामदार करा अशा आशयाचे फलक लावले आहेत. सदर फलक कर्जत शहर आणि तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.  महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यानी शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारामध्ये कर्जत जामखेडचा लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून हवा यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी फलक प्रसिद्ध करत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

युवक चेहरा म्हणून रोहित यांना मिळू शकते संधी ?

लोकसभेच्या निमित्ताने रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाची निवड विधानसभेसाठी केली होती. खा सुजय विखे यांना फक्त कर्जत जामखेड आणि विशेष म्हणजे विद्यमान पालकमंत्री राम शिंदे यांच्याच मतदारसंघातून कमी मताधिक्य होते. याच नाराजीचा फायदा रोहित यांनी घेत विजय संपादन केला. युवकांमध्ये त्यांची विशिष्ट क्रेझ असून त्यांच्या आग्रहाखातीर पुढील मंत्रीमंडळाच्या विस्तारात रोहित यांना निश्चीत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कै आबासाहेब निंबाळकर, माजी मंत्री राम शिंदे यांच्यानंतर तिसऱ्या वेळेस रोहित पवार यांच्यारूपाने कर्जत जामखेडला संधी मिळेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post