महागाईचा फटका ; पैठणीच्या खरेदी-विक्रीत घट


माय अहमदनगर वेब टीम
येवला : पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.. असे गुणगुणत प्रत्येक मराठमोळ्या महिलांची-तरुणींची एक इच्छा असते की, आपल्याकडे एक तरी पैठणी असावी. त्यामुळे महाराष्ट्राचे महावस्त्र अशी ओळख असलेल्या पैठणीला नेहमीच मागणी असते. त्यातही येवल्याची पैठणी जगप्रसिद्ध. पैठणी येवल्याचीच हवी, असे म्हणत महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोप-यातून ग्राहक पैठणी खरेदीसाठी खास येवल्यात येतात. पण, आजच्या घडीला येवल्यातील पैठणी विणणारे कारगीर हवालदिल झाले आहेत. कारण, मंदीचा फटका आता पैठणी उद्योगालाही बसला आहे. मंदीमुळे पैठणीच्या खरेदी-विक्रीत घट वाढली आहे.

पैठणी हे सर्वात महागडे वस्त्र म्हणून ओळखले जाते. पण, तरीही सणासुदीला आणि लग्नसंमारंभासाठी पैठणी खरेदी केलीच जाते. त्यामुळे येवल्यात नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी पैठणी खरेदीसाठी असते. मात्र, गेल्या काही दिवसांत ही गर्दी हळूहळू ओसरू लागली आहे. कारण, हातमागावरच्या अस्सल पैठणीसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रेशमाचे भाव वाढले असून पैठणीवर जीएसटीही लावण्यात आला आहे. त्यामुळे पैठणी तयार करणे आणि विकणेही महागले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने पैठणी विक्रेत्यांनी पैठणीच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.

साधारण याआधी रेशमाचे दर रु. ३६०० पर्यंत होते. आता रु. ४००० पर्यंत गेलेले आहे. विणकरांना याचा मोठा फटका बसलेला आहे. त्या प्रमाणात साडय़ांचे भाव काही वाढले नाहीत. त्यातच मशीनवर विणल्या जाणा-या सेमी पैठणींना मोठी मागणी वाढलीय. याचा फटका हातमागावर अस्सल पैठणी विणणा-या विणकरांना बसला आहे.

पैठणीच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सध्याच्या किंमतीत पैठणी विकणे अशक्य झाले आहे. तर यात जितका फायदा झाला पाहिजे तितका फायदीही विक्रेत्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आम्हाला घर चालवणे आता अवघड झाले आहे. तरी शासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन विचार करावा, अशी विनंती कारागिरांकडून होत आहे. सरकारने पैठणी विणणा-या कारागिरांसाठी काही केले नाही, तर कारागिरांना वाढत्या स्पर्धेत तग धरणे कठीण आहे. असेच सुरू राहिल्यास अस्सल पैठणी इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post