बिझनेस ; एका वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपतीत सव्वा लाख कोटींनी वाढ!
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मंदी आणि भांडवली बाजारातील अनिश्चिततेने जगभरातील उद्योजकांना हैराण केले असताना ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे मुकेश अंबानी मात्र अपवाद ठरले आहेत. मागील वर्षभरात अंबानी यांच्या संपत्तीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ लाख १९ हजार कोटींची (१७ अब्ज डॉलर) भर पडली आहे.
अंबानी यांची संपत्ती वाढीत रिलायन्सच्या शेअरने सिंहाचा वाट उचलला आहे. मागील वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल ४० टक्क्यांनी वधारला. अंबानी यांची एकूण संपत्ती चार लाख कोटींच्या पुढे गेली आहे. अब्जाधीश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती ६१ अब्ज डॉलर अर्थात ४ लाख २७ हजार कोटी आहे.
एकीकडे अंबानी यांची संपत्ती वाढत असताना अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत १३.२ अब्ज डॉलरची घट झाली. बेझॉस यांनी वर्षभरात ९२ हजार ४०० कोटी गमावले. जागतिक पातळीवर अतिश्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मॉ यांच्या संपत्तीत ११.३ अब्ज डॉलरची (७९ हजार १०० कोटी) वाढ झाली आहे.
तेल आणि वायू क्षेत्रातील दबदबा असलेल्या अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने दूरसंचार, किरकोळ व्यापाराकडे मोर्चा वळवला आहे. मागील दोन वर्षात ‘रिलायन जिओ’ने दूरसंचार सेवेत मोठी मुसंडी मारली आहे. वर्षभरात रिलायन्सच्या शेअरमधील वृद्धी ही शेअर निर्देशंकाच्या तुलनेत सरस ठरली आहे. गुंतवणूकदार रिलायन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

Post a Comment