स्नेहालय संस्था नव्हे सेवातीर्थ -आ. निलेश लंके


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - समाजाला नागरी आणि मुलभूत सेवा देणे हे शासनाचे काम असले, तरी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचे काम मात्र सामाजिक संस्था आणि संघटना करू शकतात. वंचित महिला आणि मुलांसाठी विविध स्वरूपाचे पथदर्शी काम गेली 3 दशके करणाऱ्या स्नेहालय संस्थेने केवळ स्वतःचा प्रकल्प विस्तार न करता शंभरावर इतर संस्थांची मातृसंस्था म्हणून कार्य केल्याने स्नेहालय एक सेवातीर्थ बनले असल्याचे प्रतिपादन अा.निलेश लंके यांनी आज केले.

स्नेहालय आणि अनाम प्रेम या संस्थांच्या नगर तालुक्यातील इसळक आणि निंबळक गावातील विविध सेवा प्रकल्पांना आमदार लंके यांनी आज भेट दिली. स्नेहालयचे अनिल गावडे, सचिन ढोरमले, विष्णू आंबेकर संजय चाबुकस्वार, आणि अनाम प्रेम संस्थेचे दीपक बुराम आणि अजित माने यांनी त्यांना विविध प्रकल्पांची माहिती दिली.

आमदार लंके यांनी स्नेहालय प्रकल्पात झालेल्या संवाद सभेत सांगितले की, वंचितांचे प्रश्‍न शासन दरबारी धसास लावताना आपण कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. धोरणात्मक पातळीवर तसेच संस्थांच्या संचालनातील विविध प्रश्न मार्ग काढण्यासाठी दर दोन महिन्यांनी सामाजिक संस्थांसोबत संवाद सभा आपण घेऊ असेही आ.लंके म्हणाले.

अहमदनगर मधील उद्योजकांच्या आमी, ह्या संघटनेचे संचालक संजय बंदिस्ती, राजेंद्र शुक्रे, राजेंद्र कटारिया, मिलिंद कुलकर्णी ,राजीव गुजर, जयकुमार मुनोत,स्नेहालय संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, आदींनी आमदार लंके यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यावर आ.लंके म्हणाले की,अहमदनगर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदारांसह उद्योजकांची एक बैठक घेतली जाईल. सध्याच्या औद्योगिक मंदीच्या वातावरणात कामगारांचे प्रपंच उध्वस्त होणार नाहीत याला आपले प्राधान्य असेल असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post