शेतकरी कर्जमाफीसह दहा रुपयांत शिवभोजनास ठाकरे सरकारची मंजुरी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दाेन लाखांपर्यंतची कर्जमाफी व प्रत्येक जिल्ह्यात गरजूंना १० रुपयांत 'शिवभोजन' या दाेन्ही याेजनांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात अाली. शिवभाेजन ही याेजना प्रायाेगिक तत्त्वावर राबवली जाणार असून त्यासाठी ३ महिन्यांत ६.४८ काेटी रुपये खर्च अपेक्षित अाहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या याेजनांची घाेषणा केली हाेती.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरू केले जाईल. त्याद्वारे राेज कमाल ५०० थाळी देण्यास शासनाने मंजुरी दिली. प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागात राबवण्यात येईल. दहा रुपयांत ३० ग्रॅमच्या दाेन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम भात व १०० ग्रॅम वरण असेल. दुपारी १२ ते २ या वेळेत ही थाळी मिळेल. या थाळीची किंमत शहरात ५० रुपये तर ग्रामीण भागात ३५ रुपये असेल. ग्राहकाकडून १० रुपये घेतल्यानंतर उर्वरित रक्कम अनुक्रमे ४० व २५ रुपये अनुदान संबंधित भाेजनालय चालवणाऱ्या संस्थेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले जाईल.

Post a Comment