स्नेहमेळाव्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची धमाल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अपंगत्वावर मात करीत मोठ्या आत्मविश्वासाने जीवन जगणार्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बंधन लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांना अवाक केले. तर संगीताच्या तालावर थिरकत हम भी किसीसे कम नही! चा संदेश दिला. साईद्वारका सेवा ट्रस्ट, हेल्प मी इंडिया, प्रहार अपंग संघटना, सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या दिव्यांग स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सलग दुसर्या वर्षी पार पडलेल्या या दिव्यांग स्नेहमेळाव्यात जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. उत्कृष्ट नृत्य, वेगवेगळे आवाज काढणे, चित्रकला, तोंडाने लिहीणे अशा विविध कलागुणांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. दिव्यांगांनी सादर केलेल्या कला-गुणांनी उपस्थितांची मने जिंकली. तर उपस्थितांनी देखील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला-गुणांसह त्यांच्या जिद्दीला सलाम केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे, नगरसेविका सुप्रियाताई जाधव, माजी नगरसेवक अॅड.धनंजय जाधव, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.लक्ष्मणराव पोकळे, सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चाँद शेख, मनपा आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, बाहुबली वायकर, व्याख्याते गणेश शिंदे, प्रकाश पोटे, राजूमामा जाधव, नवनाथ औटी, संभाजी भुटे, अॅड.संतोष गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, दिव्यांगांचा स्नेहमेळावा हा प्रेरणा व ऊर्जा देणारा क्षण आहे. परिस्थितीवर मात करित दिव्यांग विद्यार्थी आपले कर्तृत्व सिध्द करीत असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साईद्वारका सेवा ट्रस्ट, हेल्प मी इंडिया व विविध अपंग संघटनांचे कार्य अभिमानस्पद आहे. जाधव कुटुंबीय राजकारणापेक्षा समाजकारणात अग्रेसर आहे. संस्थेच्या माध्यमातून वंचित व दुर्बल घटकांना ते मदत करीत असून, वंचितांच्या चेहर्यावर हसू फुलविण्याचे कार्य ते करीत असल्याचे सांगितले. अॅड. धनंजय जाधव यांनी गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. बाळासाहेब बोठे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन दिव्यांगांना स्फुर्ती व भरारी घेण्यासाठी व्यासपिठ निर्माण करुन दिल्याचे सांगितले.
माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अॅड.धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून सलग दुसर्या वर्षी या दिव्यांग स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगांसाठी नेहमीच मदतीचा हात देणारे जाधव यांचा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या मेळावा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे मितेश शहा, स्वप्निल मुनोत, विनायक नेवसे, दत्ता गाडळकर, राहुल मुथा, प्रविण जोशी, सागर बोगा, सोनू बोरुडे, महेश महादर, रुपेश यनगुपटला, अवी नल्ला, सचिन दिवाणे, संजय बोगा आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले. आभार मितेश शहा यांनी मानले. भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment