अहमदनगरच्या किओस्क प्रणालीची नागपूर येथील राष्ट्रीय परिषदेत दखल



माय अहमदनगर वेब टीम

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले सादरीकरण

अहमदनगर - केंद्रीय कार्मिक व प्रशासकीय सुधार मंत्रालय आणि राज्य शासनाच्या वतीने नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत अहमदनगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना महसूल विषयक कागदपत्रे विनाविलंब मिळण्यासाठी सुरू केलेल्या वन टाईम डॉक्युमेंट मशीन अर्थात किओस्क प्रणालीची दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात सादरीकरण केल्यानंतर त्यास उपस्थितांनी दाद देत या उपक्रमाबद्दल कौतुकोद्गार काढले.


केंद्रीय कार्मिक व प्रशासकीय सुधार मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. 'सार्वजनिक सेवा पुरवण्यात सुधारणा करण्या संदर्भात सरकारची भूमिका' हा या परिषदेचा विषय होता. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्हा प्रशासनाने केलेल्या या उपक्रमाचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. दिवेदी यांनी केले. नागरिकांच्या उपयोगाची कागदपत्रे वन टाइम डॉक्युमेंट मशीनमुळे केवळ एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ तसेच त्यांच्या पैशाची बचत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सेवा हक्क हमी कायदा आणि माहिती अधिकार या कायद्यांतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी आता अधिक काळ थांबावे लागत नाही तर केवळ एका मिनिटात या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध होत असल्याने या कायद्याचा हेतू सफल होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


केवळ एका क्लीकवर कोणत्याही नागरिकांना त्यांना हवी असणारी ही कागदपत्रे मिळू शकतात. जमिनीचा सातबारा, आठ अ खाते उतारा, कडईपत्रक, जन्म मृत्यूनोंदी, इनामपत्रक आदी दस्तावेज याद्वारे नागरिकांना उपलब्ध होत आहेत. सन 1930 पासून ते सन 2013 पर्यंतची तब्बल पावणेदोन कोटी कागदपत्रांचे (जुने अभिलेख) स्कॅनिंग त्यासाठी करण्यात आले असून तो डाटा या प्रणालीत साठवण्यात आला आहे. यात जुने गट नंबर आणि जुने सर्वे नंबर उपलब्ध आहेत. नागरिक त्यांना हव्या त्या माहितीवर क्लीक करुन ती कागदपत्रे मिळवू शकतात. केवळ वीस रुपयांत ही कागदपत्र त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही प्रणाली एटीएम मशीन सारखीच काम करते. मशीनवरील कॅश रिसीव्हर मध्ये दहा रुपयांच्या दोन किंवा वीस रुपयांची एक नोट टाकली की नागरिकांना हव्या असलेल्या दस्तावेजाची प्रत त्यांना मिळते.

जिल्हाधिकारी श्री द्विवेदी यांनी पॉवरपॉईंट सादरीकरण यावर डॉक्युमेंट मशीन मुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुरविण्यात आलेली सेवा आणि त्यामुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होत असल्याचे यावेळी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post