नगर: अकरा हजार विद्यार्थ्यांकडून जनजागृतीमाय नगर वेब टीम

अहमदनगर – प्लॅस्टिकमुक्तीसाठी महापालिकेच्या सुरू असलेल्या अभियानात महात्मा गांधी जयंतीदिनी प्लॉगरनद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती करण्यात आली. मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांसह विविध सामाजिक संस्था, कलाकार, बचत गटांच्या महिला प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदविला. शहरातील ५३ शाळांमधील सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांनी शाळांच्या परिसरात जनजागृती केली. स्थानिक कलाकरांनी शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. अभियानांतर्गत उभाललेल्या सेल्फिपॉइंटवरही युवकांनी गर्दी केली होती.
राज्यभरात प्लॅस्टिकमुक्तीची जनजागृती करण्यासाठी प्लॉगरनसह विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेने यासाठी विशेष नियोजन करत शहरात आठ ठिकाणी कार्यक्रम राबविले. प्रथम वाडियापार्क येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त सुनील पवार व प्रदीप पठारे, अभिनेते प्रकाश धोत्रे, मोहनीराज गटणे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, नाट्य कलाकार क्षितीज झावरे, सतीश शिंगटे, साहित्यिक सदानंद भणगे आदींसह रोटरी क्लब, हरियाली, बचत गटांच्या महिला सदस्या उपस्थित होत्या. नगरकरांना सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी शपथ देण्यात आली. उद्यान विभागाच्या शशिकांत नजन यांच्या पुढाकारातून व स्थानिक कलाकरांच्या सहभागातून विजय उमाप, सूरज शिंदे, विशाल साबळे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष पथनाट्य सादर केले.

मनपा शिक्षण विभागाच्या प्रयत्नातून १० हजार ९२१ विद्यार्थी, ५९४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही अभियानात सहभाग घेतला. आज (गुरुवारी) विविध भागात प्लॅस्टिक संकलन मोहीम सुरूच राहणार आहे. तसेच जनजागृतीसाठी पथनाट्येही सादर केली जाणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post