आता शेवटचे दोनच दिवस !



माय नगर वेब टीम

अहमदनगर - जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवसच बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील दिग्गज उमेदवार आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यामुळे चांगलीच गर्दी होणार आहे. आतापर्यंत विधानसभेच्या १२जागासाठी ३१५ इच्छुकांनी ५१७ उमेदवारी अर्ज नेले असले तरी प्रत्यक्षात १७ उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. यामुळे शेवटच्या दोन दिवसांत जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मंगळवारी नगर शहरासह, शेवगाव, अकोले, कोपरगाव, राहुरी, संगमनेर, शिर्डी या विधानसभा मतदारसंघांतून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मागील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक, त्यानंतर शनिवारी आणि रविवारी सलग सुट्टी असल्याने सोमवारी ९ तर मंगळवारी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

त्यानंतर पुन्हा बुधवारी पुन्हा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाहीत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार (दि.०३) आणि शुक्रवार (दि.०४) असे शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आ. शंकरराव गडाख वगळता अन्य बड्या नेत्याचे उमेदवारी अर्ज दाखल होणे बाकी आहे.

यांचे अर्ज बाकी
येत्या दोन दिवसांत मंत्री विखे, आ. वैभव पिचड, आ. स्नेहलता कोल्हे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. राहुल जगताप, आ. संग्राम जगताप, आ. विजय औटी, आ. बाळासाहेब मुरकुटे, रोहित पवार, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, अनिल राठोड, प्रताप ढाकणे, नीलेश लंके यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. यातील काही नेते गुरूवारी तर काही शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post