उजळो आरोग्याचा दीप





माय नगर वेब टीम

दोन दशकाहून अधिक काळ कॅन्सर रुग्णांवर उपचार करणार्‍या माझ्यासारख्या कॅन्सर तज्ज्ञाच्या हॉस्पिटलतर्फे पुस्तक प्रकाशित करण्याचा हा प्रयोग म्हणजे कॅन्सरवर एका सर्वस्वी वेगळ्या पातळीवर उपचार करण्याचा प्रयत्न आहे. कात्री किंवा स्कालपेलचा वापर न करता कोणत्याही प्रकारची भूल न देता उपचार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न, पण तेवढाच प्रामाणिक आणि मनापासून केलेला. हे उपचार करण्याची गरज अशी एकाएकी आणि तडकाफडकी निर्माण झाली नाही.

ती हळूहळू उभी राहत होती. जाणवू  लागली होती. कॅन्सर तज्ज्ञ म्हणून काम करताना आजपर्यंतच्या अनुभवाने मला नावलौकिक मिळाला, समाजात ओळख मिळाली, पण आणखी एक अशी गोष्ट मिळाली जी हातावर घेऊन दाखवता येणार नाही आणि ती म्हणजे समाजाच्या विविध वृत्ती-प्रवृत्तींची अगदी जवळून झालेली ओळख. कोणत्याही डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एखादा पेशंट शस्त्रक्रियेसाठी टेबलवर येतो तेव्हा तो तिथे एकटा येत नसतो. त्याच्या आप्त-स्वकियांच्या रुपाने समाजाचा काही भाग आणि त्यातील वृत्ती-प्रवृत्तीही जणू आमच्या टेबलवर येत असतात. कॅन्सरवर उपचार घेणार्‍या रुग्णांच्या निमित्ताने आजवर दिसलेला, जाणवलेला समाज कसा आहे? विविध रंगी आहे तो. सासूला कॅन्सर झाला म्हणून तिच्या नकळत घरात तिची भांडी आणि कपडे वेगळे ठेवणारी सून त्यात आहे.

आईला कॅन्सर झाला हे समजताच तिची नातवंडे तिच्यापासून तोडणारे कुटुंबीय पण ह्याच समाजाचा घटक आहेत. आपल्याला कॅन्सर झालाय हे समजूनसुद्धा भीतीपोटी त्यावर उपचार न घेणारे पेशंट्स आणि तंबाखू-गुटख्यासारख्या व्यसनांमुळे तरुण पिढीत कॅन्सरचे प्रमाण बेसुमार वाढतेय, हे दिसत असूनही त्यावर उपाय न करणारे हे सगळे ह्याच समाजाचा भाग आहेत की! एखाद्या व्यक्तीच्या शरीरात वाढणारी गाठ काढण्याचा उपाय माझ्यासारखा डॉक्टर करू शकतो. पण कॅन्सर नावाच्या आजाराबद्दल आपल्या समाजात जे अनेक गैरसमज आहेत, कमालीचे भय आहे. ह्या आजाराबद्दल बोलताना वाटणारी लाज, संकोच आहे त्यावर कसा उपाय करता येईल?

असे खूप काही मनात असतानाच लक्ष गेले ते ह्या सर्व नकारात्मक गोष्टींच्या पलीकडे उभ्या असलेल्या आणि कॅन्सरला निरोप देऊन रसरशीत जीवन जगत असलेल्या माणसांकडे! प्रत्येक व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात असलेली ही माणसे आपल्या परीने त्या त्या क्षेत्राला समृद्ध करताना दिसत होती. कॅन्सरच्या छायेतून बाहेर पडून पुन्हा तेवढेच सुंदर आयुष्य तुमच्यासमोर उभे असते हे आपल्या कृतींमधून सिद्ध करणार्‍या ह्या लोकांना बघताना वाटले, ह्यांच्या कहाण्यांमध्ये खूप जोम आहे. सकारात्मक ऊर्जा आहे. कॅन्सरबद्दलचे तर्‍हेतर्‍हेचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि ज्यांचा उपचारांची गरज आहे त्यांना उपचार घेण्यासाठी प्रेरित करू शकतील अशाच ह्या गोष्टी आहेत.

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान आणि संशोधन ह्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा कमालीचा बदलला आहे. हाताने करायच्या शस्त्रक्रिया ते रोबोटिक शस्त्रक्रिया असा मोठा पल्ला तंत्रज्ञानाने पार केला आहे. अधिक परिणामाकारक औषधे उपलब्ध होत आहेत, पण दुसरीकडे कॅन्सरची व्याप्ती तेवढीच वाढतच आहे. पूर्वी तीन-चार दिवसांतून एखादा नवा पेशंट येत असे, आता हॉस्पिटलमध्ये रोज नव्याने येणार्‍या पेशंटस्ची संख्या किमान वीस आहे. पण ह्या वाढत्या संख्येपेक्षा चिंता वाटतेय ती कॅन्सरच्या कमी होत असलेल्या वयाची. आतापर्यंत हा आजार वृद्ध पिढीचा होता, पण गेल्या काही दशकांत तो केवळ तरुण पिढीवर आणि आता तर कितीतरी प्रश्‍नांनी भारतातील माणूस हैराण होतो. हे प्रश्‍न घेऊन कुणाकडे जायचे आणि त्याची उत्तर मागायची हे त्याला अशा वेळी समजत नाही. जो समाज ही उत्तरे देऊ शकतो, त्याला उपचारांना सामोरे जाण्यास प्रवृत्त करू शकतो. धीर देऊ शकतो तोच समाज बहुसंख्येने, दुर्दैवाने अनेक प्रश्‍नांच्या गुंत्यात अडकला आहे. सकारात्मक ऊर्जा छातीत भरून घेतली आणि उपचारांचा काळ हा फक्त स्वत:कडे लक्ष देण्याचा काळ आहे, असे स्वत:ला बजाव निर्धाराने उपचारांना भिडल्यास काहीही अशक्य नाही

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post