ईडीने शरद पवारांवर केलेली कारवाई योग्यच ; खा. सुजय विखे



माय नगर वेब टीम

अहमदनगर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई योग्यच असून त्यांचे पाप झाकण्याचे काम कोणी करू नये, पवार यांना पुढील दोन वर्षात जेलमध्ये घालण्याचे काम करणार असून पाटबंधारे खात्यातील त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबाशी कोणीही सहानुभूती दाखवू नये असा घणाघात खा. सुजय विखे यांनी केला आहे.

महायुतीचे उमेदवार आ. शिवाजी कर्डिले यांच्या राहुरी येथे आयोजित संकल्प सभेत खा. विखे बोलत होते. यावेळी आ. कर्डिले, सुभाष पाटील, विक्रम तांबे, शरद बाचकर, पुरुषोत्तम आठरे, रफीक शेख, अॅड. मिर्झा मनियार, रावसाहेब तनपुरे, बाळासाहेब अकोलकर, शिवजी सागर, सत्यजित कदम, सुरेंद्र थोरात, उदयसिंह पाटील, दादा सोनवणे, आसाराम ढूस, रावसाहेब साबळे, विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. विखे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. कर्डिले आणि विखे यांची युती कायम आहे ती तुटणार नाही त्यामुळे आमचे कान कोणी भरू नयेत. जिल्हा १२-० करणार असून कर्जत-जामखेडमधून पालकमंत्री राम शिंदेच निवडून येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आ. कर्डिले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारण सोडून देण्याचा विचार केला होता. मात्र स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राहुरीतून भाजपची उमेदवारी दिली. त्यांच्यामुळे मी आमदार झालो.

मतदारसंघात विकासकामे पूर्ण केली. आतापर्यंतच्या  ९ मुख्यमंत्र्यांमध्ये देवेेंद्र फडणवीस हे कर्तबगार मुख्यमंत्री आहेत. ना. पंकजा मुंडे यांनी मोठा निधी दिला. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर रस्ते करता आले. मतदारसंघात मोठा विकास करता आला. समोरचा उमेदवार अजून ठरायचा आहे. आपल्या विकासकामामुळे समोरचा उमेदवार अजून निश्‍चित झालेला नाही त्यामुळे मी पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने निवडून येईल असा विश्‍वास आ. कर्डिले यांनी व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post