गर्भ पूर्व-संस्कार
माय नगर वेब टीम
लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी निघुन गेली’ समर्थ रामदासांनी १६ व्या शतकामध्ये सांगितलेल्या या उक्तीची प्रचिती एकविसाव्या शतकातील माता-पित्यांना ज्ञानाच्या व निरीक्षणाच्या आधारे निश्चितच आली आहे. त्यामुळेच आजचे पालक ‘हम दो हमारे दो‘ न म्हणता ‘हम दो हमारा एक’ या वचनावर आले आहेत. मात्र हे एकच बाळ निरोगी, बुद्धिमान, सामाजिकतेची जाण असणारे, प्रेमळ, सुंदर अशा सर्व गुणांनी संपन्न असावे ही सहजतेने येणारी भावना प्रत्येक पालकाच्या मनात असते. अशा बाळाची अपेक्षा असणार्या पालकांनी तयारी केव्हापासून करायची? ती सुरुवात होते विवाह ठरवण्यात पासून, चरकाचार्यांनी अतुल्यगोत्रीय अध्यायात एकाच गोत्रातील व्यक्तींनी विवाह करू नये असे सांगितले. सगोत्र विवाह केलेल्या पालकांच्या बालकांमध्ये आई-बाबामधील सदोष गुणसूत्रे एकत्र येऊन विकृत बाळे जन्माला येतात हे एकोणिसाव्या शतकात mendel’s low of Inheritance ने दाखवून दिले आहे.
उन्हाळ्यात, पावसाळ्यात व हिवाळ्यात आपल्या शरीरातील बलाची स्थिती भिन्न भिन्न असते. जसे उन्हाळ्यात शारीरिक बल कमी असते मग त्या काळात गर्भधारणा झाली तर बाळाचे बलही कमी असते. म्हणून आयुर्वेदात बाळाची प्रकृती गर्भधारणेचा महिना कोणता यावर ठरवली जाते. हिवाळा सर्वोत्तम बलाचा महिना, अर्थात तेव्हा होणारी गर्भधारणा सर्वात उत्तम.
गर्भधारणा माता-पित्याच्या बीजापासून होते हे बीज ‘अनुपहत’ असावे असे आयुर्वेद सांगतो. अर्थात दोघांचीही बीजे निर्दोष असावीत. ज्या शरीरात नऊ महिने गर्भ वाढणार आहे त्या शरीरातील सप्तधातू निर्दोष व बलवान हवेत म्हणून गर्भधारणेपूर्वी बीजशुद्धी, शरीरशुद्धी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग तुकारामांच्या ओवीचा प्रत्यय प्रत्येक पालकाला निश्चित येईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. विशिष्ट वयात स्त्रीबीज व पुरुषबीज बलवान असतात हे आता हॉर्मोन्सच्या तपासणीतून सहज सिद्ध करता येते. म्हणून त्या वयात गर्भधारणा होणे निश्चितच उत्तम.
आजची बदलती जीवनशैली जसे रात्री जागरण, सकाळी उशिरा उठणे, दुपारी झोपणे, आंबट, खारट, तेलकट पदार्थ अर्थात फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणे, अवेळी जेवणे, अति जेवणे किंवा डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे, अति व्यायाम करणे किंवा अजिबात व्यायाम न करणे, प्रदूषित हवा, अन्न-पाणी या सर्वांचा आई-वडिलांच्या शरीरावर व पर्यायाने बीजावरही परिणाम होतो.
कॅल्शियम, लोह, ल12, मँगनीज, पोटॅशिअम अशा विविध घटकांची शरीर पोषणास गरज असते. पूर्वी याची औषधे घ्यावी लागत नव्हती कारण आहारातून हे घटक मिळत होते. या घटकांनी युक्त आहाराचे नियमित सेवन केले तर त्यांची कमतरता शरीरात येणारच नाही. शरीरात या घटकांची कमतरता झाली तर बाळामध्ये वेगवेगळे आजार दिसून येतात, म्हणून गर्भधारणेपूर्वी आई-बाबांनी या गोष्टी आहारातून घेणे गरजेचे आहे.
आयुर्वेद केवळ शरीराची शुद्धी नाही सांगत तर आई-वडिलांच्या मनाच्या शुद्धीचे महत्त्वही तेवढेच अधोरेखित करतो. आपण जसा विचार करतो तसे स्त्राव आपल्या शरीरात तयार होतात, हे आता पिट्युटरी हायपोथॅलॅमस क्सिसच्या कामावरून सहज सिद्ध करता येते. आम्ही आतापर्यंत असे समजत होतो जीन्समध्ये बदल करता येत नाहीत पण एपीजेनेटिक्स सायन्सने हे दाखवून दिले आहे की विशिष्ट प्रयोगांनी जीन्समुळे होणार्या दोषांवर मात करता येते.
Post a Comment