५ वर्षांत राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज – शरद पवार






माय नगर वेब टीम
वर्धा – एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी होती. मात्र गेल्या 5 वर्षात भाजपा सरकारने राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज करुन ठेवले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर केला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धातील हिंगणघाटमधील सभेत काल उपस्थितांना संबोधित केले. भाजपा सरकारने राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम केले असून त्यांच्या हातून आता सत्ता काढून घेण्याचे काम निवडणुकीत करायचे आहे असेही ते म्हणाले.

राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डेमुक्त राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डेयुक्त राज्य घडवण्याचा निर्धार केलाय. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात कांद्याला चांगला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी उध्वस्त झाला आहे. तसेच आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना कपाशीला 7 हजार भाव देण्याची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यावर यांनी पाच वर्षांत कपाशीला एकदाही 7 हजाराचा भाव दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या भागात अतिवृष्टी झाली, शेतकर्‍यांनी पीकविमा काढून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील 70 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नसल्याचा आरोप देखील शरद पवारांनी भाजपा सरकारवर केला आहे.

कलम 370 रद्द करणार्‍यांनी कलम 371 चं काय करणार ते सांगावं
आजही लोक पुलवामा, कलम 370 वर मतं मागत आहेत. भाजपा आम्हाला विचारत आहे की, 370 वर राष्ट्रवादीची भूमिका काय? लोकसभेत सरकारच्या या निर्णयाला काहीजणांनी विरोध केला. मात्र, त्यांच्या विरोधाला न जुमानता निर्णय घेतला गेला आणि आता त्यावर मतं मागितली जात आहेत. कलम 370 रद्द करणार्‍यांनी 371 चं काय करणार याचं उत्तर द्यावं. कारण, कलम 371 मुळं ईशान्य भारतातील जमिनी विकत घेता येत नाहीत, असा सवाल शरद पवार यांनी भाजपाला केला आहे. कलम 370 वरुन लोकांना फसवण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागपूर जिल्ह्यात प्रचारसभेत ते बोलत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post