‘या चिमण्यांनो, परत फिरा रे’; शिवसेनेकडून गांधींची मनधरणी



माय नगर वेब टीम

अहमदनगर  – अनेक वर्षे शिवसेनेत राहून आता पक्षापासून अलिप्त असलेले किंवा पक्षाबाहेर असलेल्यांना ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे ’ अशी साद दिल्यानंतर आता माजी खासदार दिलीप गांधी यांच्याबरोबर जुळवून घेण्याचे जोरदार प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झाले असून, यात पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असलेल्या एका माजी नगरसेवकाने पुढाकार घेतला आहे. मागील पाच वर्षांचा कालखंड वगळला तर भाजप आणि शिवसेनेने कायम एकत्र निवडणुका लढविल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी खासदार दिलीप गांधी यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने गांधी यांनी युतीचा धर्म पाळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राठोड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी गांधी व समर्थक हजेरी लावतात की नाही हे महत्वाचे ठरणार आहे.

 शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आणि माजी खासदार दिलीप गांधी यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते होते. महापालिका निवडणुकीनंतर ते आणखी तीव्र झाले होते. पुन्हा युती झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत गांधी यांचे काम करणार नाही, असे राठोड यांनी स्पष्ट केले होते. तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला राठोड चालणार नाहीत, अशी भूमिका गांधी यांनी घेतली होती.

लोकसभा निवडणुकीत गांधी यांची उमेदवारी कापली गेली, मात्र विधानसभा निवडणुकीसाठी राठोड यांना युतीची उमेदवारी मिळाली. उमेदवारी निश्चित झाल्यापासून राठोड यांनी डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेपासून दुरावलेल्यांना जवळ घेण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे गांधी यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच गांधी सोबत असतील, यासाठी प्रयत्न होत आहेत. शिवसेनेपासून दुरावलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांना पुन्हा शिवसेनेच्या कामात सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यापूर्वी सतीश मैड यांनाही शिवसेनेत घेतले गेले आहे.

भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक किशोर डागवाले हे देखील पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. ते सध्या गांधी यांच्या ‘गुड बुक’मधील आहेत. गेल्या दोन दिवसांत जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी डागवाले यांना मध्यस्थीसाठी साकडे घातले. त्यात यश देखील आले. पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या वरील पदाधिकार्‍यांनी गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र याच्यासमवेत बैठक घेतली. बुधवारी पुन्हा ही बैठक रात्री उशशिरापर्यंत चालली होती. त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे खात्रीलायक समजते. आता राठोड आणि गांधी यांची बैठक होणार आहे. मागील सर्व गोष्टींवर चर्चा होऊन झाले गेले विसरून पुन्हा एकत्र येण्याचे या बैठकीत ठरले आहे. शिवसेनेतील नाराजांना परत सक्रीय करतानाच राठोड यांच्या विरोधात असलेला भाजपमधील मोठा गट राठोड यांच्यासमवेत आल्यास राठोड यांचे ते मोठे यश असेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post