प्रचारात प्लॅस्टिकला टाटा…




माय नगर वेब टीम

अहमदनगर – शासनाने प्लॅस्टिक बंदीची घोषणा केल्याने निवडणुकीच्या प्रचारातूनही प्लॅस्टिक गायब झाले आहेत. प्रचार साहित्य उत्पादन करणार्‍या कंपन्यांनीच प्लॅस्टिक साहित्याचे उत्पादन यंदा केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्यात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोकसभेवेळी असेल्या मोदी मास्कची क्रेझ विधानसभा निवडणुकीत गायब झाली असून भगव्या झेंड्याची लहर राज्यासह जिल्ह्यात आली आहे. राष्ट्रवादीनेही प्रचारात भगव्याचा वापर केल्याने त्याचा खप वाढल्याची माहिती विक्रेते देत आहेत.


विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून आमदारकीचे स्वप्न बळगणार्‍या इच्छुक उमेदवारांनी मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. युती-आघाडीच्या जागवाटपाच्या घोळामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात होते. ऐनवेळी कोणता झेंडा हाती घ्यावा लागणार हे कार्यकर्त्याना माहित नसल्याने ते ही गोंधळात होते. यामुळे झेंड्याविनाचा प्रचार सुरू होता. याचा फटका राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य विकणार्‍या बाजारावर झाला होता. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन देखिल प्रचार साहित्य विकणार्‍या बाजारात फारशी उलाढाल होत नव्हती.


पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी मास्कची प्रचारात प्रचंड क्रेझ होती. यावेळी मात्र उलनच्या मफलरची मागणी वाढली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेल्या झेंड्यांची मागणीदेखील वाढली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रचार रॅलीत भगवे झेंडे लावायला सुरुवात केल्याने ही मागणी वाढली असल्याचे सांगितले जाते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, कॉगे्रस, भाजप, राष्ट्रवादी, मनसे या प्रमुख पक्षांनी स्वातंत्र्य निवडणूका लढल्या होत्या. त्यामुळे प्रचार साहित्य विक्रीचा व्यवसाय तेजीत होता. उमेदवारापेक्षा प्रचार साहित्य विक्री करणार्‍या व्यवसायिकांच्या नजरा युती-आघाडीकडे लागल्या आहेत. नगर शहरात प्रचार साहित्य विक्री करणार तीन ते चार दुकाने आहेत. नगर जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील राजकीय पक्षांसह अपक्षांनी प्रचार साहित्याची बुकींग केल्या आहेत. नगर जिल्ह्यासह बीड, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात प्रचार साहित्याची बुकींग करण्यात आली आहे. पितृपक्ष सरल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. जागा वाटप निश्चित झाल्यावर प्रचाराला गती मिळेल, त्यानंतर साहित्य विक्रीत तेजी येईल असे हे विक्रेते सांगतात.


डमी ईव्हीएम मशीनही !
निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील बाजारपेठा प्रचार साहित्यांनी गजबजल्या आहेत. कापडी झेंडे, स्टिकर, मफलर, बॅनर, बिल्ले, टोप्या, टी शर्ट, डमी व्होटर मशीन, विविध पक्षांचे चिन्हे, मनगटावर बांधण्याचे रबरी पट्टे असे साहित्य बाजारात विक्रीला उपब्लध आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला प्रचार साहित्यांची 5 ते 10 टक्क्यांनी भाववाढ झाली आहे. बहुतांश प्रचार साहित्य नगर शहरात तयार केले जाते. मोठ्या आकाराचे झेंडे दिल्ली, युपी व मुंबई येथून खरेदी केले जातात. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी प्रचार साहित्य बाजारात आले आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post