विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी रयतच्या सर्व शाळांमध्ये स्मार्टबोर्ड
संजय नागपुरे यांची माहिती; सारोळा कासारला कर्मवीर जयंती साजरी
माय नगर वेब टीम
अहमदनगर- रयत शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेच्या मुलांसाठी शैक्षणिक विद्यापीठ आहे. संस्थेच्या मार्फत शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असतात. त्याचाच एक भाग म्हणुन रयतच्या सर्व शाळांमध्ये स्मार्टबोर्ड ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे निरीक्षक संजय नागपुरे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सारोळा कासार (ता.नगर) येथे नुकतीच कर्मवीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास उपसरपंच जयप्रकाश पाटील, शिक्षकनेते संजय धामणे, उद्योजक केशवराव काळे, माजी सरपंच भानुदास धामणे, पोपटराव कडुस, दत्तात्रय धामणे, प्रा.विश्वासराव काळे, पोपटराव काळे, संजय काळे, गजानन पुंड, नामदेव काळे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वैजिनाथ धामणे, शहाजान तांबोळी, अशोकराव धामणे, मुश्ताक शेख, सोपानराव चोभे आदी उपस्थित होते.
निरीक्षक नागपुरे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्युनगंड बाळगु नये. शहरी भागातील आधुनिक सोयी-सुविधा असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यश काबीज करु शकतात. रयतमधील विद्यार्थ्यांनी हे यापुर्वी अनेकदा करुन दाखविले आहे. जगात अशक्य असे काहीही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य सावकार शिंदे यांनी केले. अहवालवाचन पर्यवेक्षक भास्करराव कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छाया खेडकर व रावसाहेब पटारे यांनी केले. एस.एस.मुरुमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गेल्या वर्षभरात विविध परीक्षा व स्पर्धांमध्ये यश मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके देवून सन्मान करण्यात आला.
Post a Comment