अहमदनगर - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने "राष्ट्रीय एकता दौड" चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह मोठ्या संख्येने नगरकरांनी यात सहभाग घेतला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या द्वारा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व सर्व स्तरातील जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करावयाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यानिमित्त आज एकता दौडचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी असिमा मित्तल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक पराग नवलकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, कबड्डीपटू अंजली वलाकट्टी, अमोल बागूल आदींची उपस्थिती होती.
पोलिस यंत्रणा, राष्ट्रीय छात्र सेना, भारत स्काऊट गाईड, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था ,स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळ व क्रीडा संस्था आदी या एकता दौडमध्ये सहभागी झाले होते.
जिल्हा क्रीडा संकुल ,वाडिया पार्क येथून रॅलीला प्रारंभ झाला. ही एकता दौड टिळक रोड मार्गे गंगाधरशास्त्री गुणे चौक -आयुर्वेद महाविद्यालय- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल - जुनी महापालिका इमारत- सब जेल चौक- चौपाटी कारंजा -दिल्ली दरवाजा- सिद्धिबाग- पोलीस परेड मैदान अहमदनगर येथे या एकता रॅलीचा समारोप झाला.

Post a Comment