भाजपमध्ये अडवाणींच्या मार्गावर खडसे
माय नगर वेब टीम
भाजपने मंगळवारी आपली पहिली यादी जाहीर केली आणि खान्देशातून बहुचर्चित नाव नसल्याचा धक्का (जोर का नव्हे) भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे सर्वसामान्यांनाही बसला. जिल्ह्यातील भाजपच्या वाटेतील सात जागांपैकी सहा जागेवरचे उमेदवार जाहीर केले. मात्र, एकेकाळचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एकनाथराव खडसे यांचे मुक्ताईनगरमधूनच नाव नाही. आता हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला येणार की काय, हे कोडे एक-दोन दिवसात सुटेल. राज्यात भाजप वाढवणार्या नेत्याचे नाव पहिल्या यादीत नाही, यामुळेच नाराज झालेल्या खडसेंना मंगळवारी म्हणावे लागले ‘कालाय तस्मै नम:’
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपमधील अनेक ज्येष्ठांना असे धक्के बसले. अटलबिहारी वाजपेयींबरोबर पक्ष वाढवणारे लालकृष्ण अडवाणी असो की मुरलीमनोहर जोशी यांनाही तिकीट मिळेल का? हे संभ्रमच राहिले. लोकसभेच्या अध्यक्षा राहिलेल्या सुमित्रा महाजन यांनाही तिकिटासाठी दुसर्या यादीची प्रतीक्षा करावी लागली. परंतु, शेवटी त्यांचे नावही आले नाही अन् त्यांनाही म्हणावे लागले ‘कालाय तस्मै नम:’
एकनाथ खडसे यांची राजकीय कारकिर्दीचा १९९५ पासून २०१६ पर्यंत चढता आलेखच होता. परंतु, २०१६ मध्ये पक्षातील विरोधकांना संधी मिळाली अन् २१ वर्षांपासून चढता आलेख असलेल्या खडसेंचा आलेख उतरू लागला. भोसरीतील एमआयडीसीतील जमीन प्रकरण अन् दाऊद इब्राहिमशी संभाषणाच्या आरोपावरुन त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बेरजेकडून वजाबाकीकडे सुरु झाली. मंत्रीपद गेले, हळूहळू पक्षातील स्थान कमी होऊ लागले. सत्ताधारी असताना अधूनमधून ते सरकारविरोधात बोलू लागले. त्यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात अन् सभागृहाबाहेर सत्ताधार्यांची अडचण होऊ लागली. त्यांना या काळात विरोधकांकडून अनेक ऑफर आल्यात. परंतु, पक्षाशी ते एकरूप राहिले.
खान्देशात नव्हे तर राज्यात खडसे यांची ओळख अभ्यासू नेता म्हणून झाली आहे. त्यांनी पक्ष वाढवला. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याबरोबर काम केले. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना स्टार प्रचारक केले गेले आहे. यामुळे त्यांना तिकीट मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु, सध्यातरी पक्षाकडून खडसे यांच्या बाबतीत वेगळाच विचार झालेला दिसत आहे. गेली २५ वर्षे पक्षाच्या राजकीय पटलावर आघाडीवर राहणार्या नेत्यास नावासाठी दुसर्या यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता या दुसर्या यादीतही खडसे यांचे नाव येईल, याची शाश्वती आता भाजप कार्यकर्त्यांनाही नाही. त्याऐवजी ही जागा शिवसेनेला सोडली जाईल अन् खडसे यांचा लालकृष्ण अडवाणी केला जाईल, अशीच शक्यता आहे. थोडक्यात काय, काळ हा माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आयुष्यात कधी काय बदल होईल, हे काळाशिवाय कोणालाच सांगता येणार नाही.
Post a Comment