द. आफ्रिकेचा डाव 275 धावांवर आटोपला, भारताकडे 326 धावांची आघाडी




माय नगर वेब टीम
पुणे - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात खेळताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 601 धावांचा डोंगर उभा करुन डाव घोषित केला. त्यास उत्तर देण्यासाठी आज (सामन्याचा तिसरा दिवस) मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सुरुवातीच्या फळीने भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची 8 बाद 162 अशी अवस्था केली होती. परंतु तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा निकराने सामना केला.

सुरुवातीला वाटत होते की, भारताचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांमध्ये गुंडाळतील, त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑन लादून पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करतील. परंतु आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी तशी संधी दिली नाही. केशव महाराज आणि व्हर्ननॉन फिलँडर यांनी भारताच्या गोलंदाजांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद 275 पर्यंत मजल मारली.

द. आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 72 धावा फटकावल्या. त्याला व्हर्ननॉन फिलँडरने नाबाद 44 धावा काढत चांगली साथ दिली. तसेच मधल्या फळीत कर्णधार फॅफ डू प्लेसिसने (64) अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून रवी अश्विन (69 धावात 4 बळी) आणि उमेश यादवने (37 धावात 3 बळी) टीच्चून गोलंदाजी केली. मोहम्मद शमी (44 धावात 2 बळी) आणि रवींद्र जडेजाने (81 धावात 1 बळी)त्यांना चांगली साथ दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post