महापालिका कर्मचार्यांनी दिल्या २३ हजार घरांना भेटी
अहमदनगर –‘स्वच्छता ही सेवा’ व‘प्लॅस्टिक निर्मूलन’ हे ब्रीदवाक्य घेऊन महापालिकेतर्फे शहरात १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात मंगळवारी (दि. ०१) सकाळी ८ वाजता सर्व कर्मचार्यांना स्वच्छतेची शपथ देऊन चार प्रभागाच्या कार्यालयातून करण्यात आली. आज पहिल्या दिवशी शहरातील २३ हजारांना घरांना भेटी देत दीड टन प्लॅस्टिक कचरा जमा केला.
कर्मचार्यांची छोट्या टीममध्ये विभागणी करून प्रभागातील प्रत्येक घराघरांत जाऊन प्लॅस्टिक निर्मूलन व प्लॅस्टिकचा वापर टाळावा याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत प्रभाग समिती क्रमांक एकच्या १४७ कर्मचार्यांनी चार हजार ४४५ घरांना भेटी देऊन आठ हजार ८९० नागरिकांच्या स्वाक्षर्या घेतल्या. प्रभाग समिती क्रमांक दोनच्या ६५ कर्मचार्यांनी चार हजार ६५९ घरांना भेटी देऊन चार हजार ६९९ नागरिकांच्या स्वाक्षर्या घेतल्या. प्रभाग समिती क्रमांक तीनच्या ७० कर्मचार्यांनी चार हजार २३५ घरांना भेटी देऊन आठ हजार ४७५ नागरिकांच्या स्वाक्षर्या घेतल्या.
प्रभाग समिती क्रमांक ४ च्या १७७ कर्मचार्यांनी नऊ हजार 761 घरांना भेटी देऊन १७ हजार ४६० नागरिकांच्या स्वाक्षर्या घेतल्या आहेत. अशा एकूण ४५९ कर्मचार्यांनी प्रभागातील २३ हजार १०० घरांना भेटी देऊन ३९ हजार ५२४ नागरिकांच्या स्वाक्षर्या घेतल्या आहेत. महापालिकेकडून कर्मचार्यांनी एक ते दीड टन कचरा गोळा केला आहे. शहरात फ्लेक्स बोर्ड लावून जनजागृती केली जात आहे. या मोहिमेला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेत चारही प्रभाग कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त सुनील पवार व डॉ. प्रदीप पठारे यांनीही विविध ठिकाणी भेटी दिल्या. दुकानांना भेटी देत त्यांनी प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे सांगतानाच त्यांच्याकडील प्लॅस्टिक ताब्यात घेतले.
रस्त्यावरील प्लॅस्टिक गोळा करणार
महात्मा गांधी जयंतीनिमित्त वाडीयापार्क येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना स्वच्छतेची देण्यात येणार. तसेच विविध भागामध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मार्गावर जॉगींग करतेवेळी प्लॅस्टिक कचरा गोळा करणे, श्रमदान करणे, मनपा शाळा व खासगी शाळा, बचत गटामार्फत रॅली काढणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
Post a Comment