दिव्यांगांना मतदानावेळी आवश्यक सुविधा पुरविण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करा - विभागीय उपायुक्त रमेश काळे




माय नगर वेब टीम
अहमदनगर -  दिव्यांग मतदारांना मतदान करतेवेळी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी भारत निवड़णूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना विभागीय उपायुक्त रमेश काळे यांनी केली.

            भारत निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त यांची दिव्यांगांसाठीचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज विभागीय उपायुक्त श्री. काळे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वीप समिती सदस्य, दिव्यांग मतदार जागृतीसाठी नेमलेले समन्वय अधिकारी, विधानसभा संघनिहाय अधिकारी यांची आज  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, स्वीप कार्यक्रमासाठीचे समन्वय अधिकारी दिलीप थोरे, दिव्यांग मतदारजागृती साठीचे समन्वय अधिकारी नितीन उबाळे, मनपा उपायुक्त सुनील पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काटमोरे, मतदारदूत अमोल बागुल आदींची उपस्थिती होती.

       यावेळी श्री. काळे म्हणाले, सुलभ निवडणुका हे या निवडणूकीसाठीचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळेच दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा देण्याबाबत निवडणूक आयोग आग्रही आहे. प्रत्येक दिव्यांगमतदाराला मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतील सहभागाविषयी कोणतीही अडचण येऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. मतदान केंद्रांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हील चेअर्स, सहायकाची मदत, स्वयंसेवक नियुक्ती, मतदान केंद्रांवर मॅग्निफिशंट ग्लासेसची उपलब्धता, मतदार केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

        अधिकाधिक दिव्यांग मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील, यासाठी यंत्रणेने गावपातळीपासून प्रयत्न करावेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी त्यासाठी काम करण्याच्या सूचना श्री. काळे यांनी दिल्या.

            यावेळी त्यांनी विधानसभानिहाय दिव्यांग मतदारांसाठी केलेली व्यवस्था, मतदार जागृती आदींबाबतची तपशीलवार माहिती घेतली.

            उपजिल्हाधिकारी श्री. पाटील, श्री. उबाळे, श्री. काटमोरे यांच्यासह श्री. बागुल यांनी माहिती दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post