...तर बांबूचे फटके मिळतील : राज ठाकरे
माय नगर वेब टीम
मुंबई - मुंबईत मराठी पाट्यांसाठी आंदोलन केलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. फोनवर मराठी ऐकू येतं त्याचं कारण मनसे आहे, आम्ही त्यासाठी आवाज उठवला. मराठी भाषा ही व्यवहारात आणली पाहिजे ही आग्रही मागणी सर्वात आधी आम्ही लावू धरली. आता त्रिभाषासूत्र ठीक आहे. पण मुंबईत चौथी भाषा आणाल तर बांबूचे फटके मिळतील असा इशाराच राज ठाकरेंनी त्यांच्या भांडुप येथील भाषणात दिला.
एवढंच नाही तर एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं आणि त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला. मात्र प्रशासनाने, शासनाने काहीही करायचं नाही का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. आपल्या साधारण अर्ध्या तासाच्या भाषणात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. खड्ड्यांची अवस्था जाऊन पहायची असेल तर जर एकदा डोंबिवलीतून प्रवास करा असंही उदाहरण त्यांनी दिलं. सरकारला याबाबत कुणीही प्रश्न विचारत नाही. असा आणि इतका हतबल महाराष्ट्र मी पाहिलेला नाही. अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र आता गलितगात्र का झाला आहे? महाराष्ट्रातील जनतेला चीड येत नाही का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तसंच एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असं आवाहनही भांडुप येथील सभेत केलं. टोलमुक्त महाराष्ट्र करु असं आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात होतं. कुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र? जे टोलनाके बंद झाले ते मनसेने आंदोलन केल्यामुळे झाले असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
Post a Comment