माय नगर वेब टीम
मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत नेते आयात करण्याची गरज नव्हती असं म्हणत गोरेगावच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. जे काही पक्षांतरं सुरु आहेत त्यावरुन समजतच नव्हतं कोण कोणत्या पक्षात चाललं आहे? भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपात गेले. घोटाळ्याचे आरोप असलेले शिवसेनेत गेले. बाळासाहेब ठाकरे असताना कुणालाही आयात करण्याची गरज भासली नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना भाजपावर निशाणा साधला.
सध्या महाराष्ट्राला कुणाही समोर घरंगळत न जाणारा सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्राला हवा आहे. विरोध करणारं कुणी नसेल तर जे सरकार येईल ते तुमच्यावर वरवंटाच फिरवेल. अशा सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष ही काळाची गरज आहे. मात्र माझ्या आवाक्यात जे दिसतं आहे तेच तुम्हाला सांगतो आहे. असं म्हणत विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल असाही आरोप राज यांनी केला.
विरोधी पक्षनेतेच भाजपात गेले, तुमचे प्रश्न मांडणार कोण? मग तुमचे प्रश्न, तुमचा राग, तुमची खदखद सरकारसमोर मांडणार कोण? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. भाजपा आणि शिवसेनेच्या सत्तेत समाधानी माणूस आहे कुठे? हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. PMC बँक भाजपाच्या माणसांनीच बुडवली. लोकांना पैसे देऊ शकत नाहीत. शेतकरी रडतो आहे, महिला, कामगार यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. निवडणुकीच्या वेळी यायचं तुमच्या चेहऱ्यावर जाहीरनामे, वचननामे चिटकवायचे. निवडणूक झाली की तुम्हाला विसरुन जायचं हेच चाललं आहे.
माझ्या हाती विरोधी पक्षाची धुरा द्या : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणातून एक इच्छा व्यक्त केली आहे. ती इच्छा म्हणजे पहिल्यादांच एका राजकीय पक्षाने केलेली मागणी केलेली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचं आहे अशी मागणी केली. ही मागणी आजवर कुणीही केली नाही. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली. राज्याला सध्या मजबूत आणि सक्षम विरोधी पक्ष आणावा याची गरज आहे. सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष हवा आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. सांताक्रुझ या ठिकाणी राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली सभा रंगली होती. अवघ्या १० ते १५ मिनिटात राज ठाकरे यांनी भाषण आटोपतं घेतलं.

Post a Comment