महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदरात 1 टक्का कपात




माय नगर वेब टीम
अहमदनगर- महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांसाठी दिवाळी भेट म्हणून कर्जावरील व्याजदरात 1 टक्का कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाने मासिक बैठकीत घेतला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन किशोर कानडे व व्हा.चेअरमन सतीश ताठे यांनी दिली.

सभासदांच्या कर्जावरील व्याजदर आता 15 ऐवजी 14 टक्के करण्यात आला आहे. याच संचालक मंडळाने गतवर्षीही सर्व कर्जावरील व्याजदरात 1 टक्का कपात केली होती. त्यामुळे वर्षभराच्या अंतराने कर्जावर यापुर्वी असणारा 16 टक्के व्याजदर 2 टक्क्यांनी कमी करत 14 टक्क्यांवर आणला आहे. संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.11) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संस्थेच्या सभासदांना ही एकप्रकारे दिवाळीची भेटच असल्याचे चेअरमन किशोर कानडे यांनी सांगितले. या बैठकीस संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाळासाहेब पवार, बाळासाहेब गंगेकर, शेखर देशपांडे, विकास गिते, विलास सोनटक्के, कैलास भोसले, अजय कांबळे, महिला संचालिका सौ. चंद्रकला खलचे, नंदा भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने आपल्या कारकीर्दीत सभासद हिताचा कारभार करुन संस्थेचा नावलौकीक वाढविला आहे. सभासदांना आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी तातडीने कर्जरुपी आर्थिक मदत केली जात आहे. सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहत असून काटकसरीने कारभार करत संस्थेचे हित जोपासले जात आहे. कर्जावरील 1 टक्का व्याजदर कमी झाल्याने सभासदांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही चेअरमन कानडे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post