'त्यांच्या' सारखी खोटी आश्वासने देणारांमधला मी नाही - आ.शिवाजी कर्डिले



माय नगर वेब टीम


राहुरी - निवडणूक विकास कामाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, मी गेली दहा वर्षे आमदार आहे, गोरगरीब जनता माझ्याकडे काम घेऊन येतात आणि मी त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. लोकांनी माझ्या कामाचा अनुभव घेतलेला आहे या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नसल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सत्ता असतानाही त्यांनी कुठलेही काम केले नाही. आम्ही कधीही जनतेला खोटे आश्वासन देत नाही आणि देणार नाही. यातले आम्ही नाहीत असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.


विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील उंबरे येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी सुभाष पाटील, चाचा तनपुरे, विक्रम तांबे, शिवाजी सागर, विजय ढोकणे, राजेंद्र गोपाळे, ह. भ. प. बाळू नाना बनकर, विजय बनकर, अरुण लांबे, सर्जेराव घाडगे, सुरसिंग पवार, अनिल दौंड, अमोल भनगडे, शामराव सोनवणे, सुभाष गायकवाड, राजेंद्र ढोकणे, रंगनाथ गवते, शिवाजी साठे, कैलास पवार, बाळासाहेब गाडे, संतोष ढोकणे, सुकुमार पवार, मधुकर गागरे, कल्पेश पटेल, सोहम भाई, सरदार सिंह, परेश भाई, सचिन मेहेत्रे, नामदेवराव ढोकणे, ज्ञानदेव शिरसागर, सिताराम ढोकणे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


आ. कर्डिले पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री सडक योजनेतून शंभर कोटी निधी मिळवून देण्याचं काम युती सरकारने केले आहे. खोटे आश्वासन देऊन आम्ही घरी बसणार नाही, 2030 पर्यंत मी या भागातून हटणार नाही. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, शेतकऱ्यांना फसवून मला पुढारी व्हायचं नाही, ज्यांनी खोटे आश्वासने दिली आहेत त्यांची परिस्थिती आपण तर पहातच आहात. अस्मितेच्या गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही त्याचा विचार करा, केलेल्या कामामुळे मतदान हे होणारच आहे. ज्याच्या हातात पंचवीस वर्षे सत्ता दिली, त्यांनी काय दिवे लावले ही जनता जाणून आहे. नीतिमत्ता चांगली असेल तर सर्व मिळतं, कारण नसताना मला मानसिक त्रास देण्याचे काम यांनी केले आहे. परंतु जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. गोरगरीबांचे काम मी करतो, त्यांच्या सुखा दुखामध्ये मी जातो, त्याचीच ऊर्जा मला मिळते. म्हणूनच मी सदा हसतमुखी आहे. 38 कोटी रुपयांच्या पाण्याची योजना मी मंजूर करून आणली, येत्या दोन वर्षात तुम्हाला फिल्टर केलेले पाणी जर दिलं नाही तर पुन्हा तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही. कारखाने आणि संस्था बंद करण्याचा आदर्श यांनी लोकांना दिला. बारा कोटी थकबाकी असलेला कारखाना आम्ही खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पुन्हा सुरू करून दिला आहे. आम्ही नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा काम केलं आहे. चाळीस वर्ष नगरपालिकेची सत्ता तुमच्या हातात दिली तुम्ही राहुरीकरांना काय दिल आहे याचा विचार तुम्ही स्वतः करा. लोकांची दिशाभूल करून सत्तेवर जायच स्वप्न जर तुम्ही पहात असाल तर राहुरीकर तुम्हाला ते स्वप्न पाहून देणार नाहीत, असा टोला यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी लावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post