राठोड यांच्या प्रचारासाठी भाजपा दारोदारी


माय नगर वेब टीम

अहमदनगर - भाजप आणि शिवसेना युती ही अभेद्य असून, भाजपाचे सर्व पदाधिकारी हे शिवसेनेच्या उमेदारांचे काम करणार आहेत. गेल्या पाच वर्षातील केंद्र व राज्यात भाजप-सेनेचे सरकार होते. या सरकारने सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतही देशात, राज्यात आणि नगरमधील दोनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्याचप्रमाणे आताही महाराष्ट्रात भाजप-सेनेचीच सत्ता येणार आहे. नगर शहरात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात भाजपाचे पदाधिकारी, जुने - नवीन कार्यकर्ते सक्रीय असणार आहेत. प्रचाराचे नियोजन पूर्ण झाले असून, त्या पद्धतीनेच प्रचार सुरु आहे. शहराच्या प्रत्येक भागात प्रचार करणार असून नगर शहरातून जास्तीतजास्त मताधिक्क्यांनी निवडून देणार आहोत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्राचारार्थ भाजपच्यावतीने मध्यवस्तीतून प्रचारफेरी काढण्यात आली होती. या फेरीचा शुभारंभ श्री विशाल गणेश मंदिर येथे आरती करुन शुभारंभ करतांना भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, माजी महापौर अभिषेक कळमकर, गौतम दीक्षित, जगन्नाथ निंबाळकर, विलास नंदी, बाबा सानप, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, मिलिंद गंधे, सुरेख विद्ये, संजय वल्लाकट्टी, मुकुल गंधे, प्रदीप परदेशी, अनिल सबलोक, सुनिल त्रिपाठी, बंट्टी ढापसे, सुषमा साळी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी वसंत लोढा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने भारत विकासाच्या वाटेवर आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रही प्रगतीपथावर आहे. भाजप-शिवसेनेची युती पुन्हा सत्तेवर येणार आहे, ही खात्री आहे. भाजप-सेनेचे सर्व जुने-नवे पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले असून, नगर शहराच्या विकासासाठी भाजपा-सेना युतीचे उमेदवार अनिल राठोड यांचा विजय निश्‍चित आहे, असेही श्री.लोढा म्हणाले.

ही प्रचारफेरी विशाल गणेश मंदिर येथे आरती करुन या फेरीस शुभारंभ होऊन ही फेरी महात्मा फुले रोड, पंचपीर चावडी, जुना बाजार आदि परिसरातून काढण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post